पिंपळगाव रेणुकाई (जालना) : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील मिरची उत्पादकांची मोठी बाजारपेठ आहे. येथून मुंबईच्या वाशी बाजारपेठेत मिरचीची वाहतूक होते. रोज दीडशे आयशर ट्रक येथून १७ हजार किलोमीटरचे अंतर पार करून मुंबई गाठतात. लवकर पोहोचणाऱ्या ट्रक चालकांना व्यापाऱ्यांकडून बक्षीस देण्यात येते. या बक्षिसाच्या लालसेपोटी ट्रक चालक सुसाट वेगाने वाहने हाकत असल्याने या रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. मागील आठवड्यात झालेल्या तीन अपघातात दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना कुणाचाही लगाम राहिलेला नाही.
आणखी किती बळी गेल्यावर पोलिस प्रशासन या मुजोर मिरची वाहन चालकांवर निर्बंध घालणार आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे मराठवाड्यातील सर्वात मोठा मिरचीचा बाजार भरतो. येथील हिरव्या मिरचीने देशात कीर्ती मिळवली आहे. त्यामुळे या ठिकाणी राज्यभरातून व्यापारी मिरची खरेदी करण्यासाठी येत असतात. सध्या या बाजारात जवळजवळ नऊ हजार पोती मिरचीची आवक आहे. ही मिरची जवळपास १५० वाहनांद्वारे इतर जिल्ह्यांसह राज्यात विक्रीसाठी जाते. मिरची ट्रकची वाहने सायंकाळी सहा वाजल्यानंतर भोकरदन ते बुलढाणा या एक पदरी रस्त्यावर सुसाट वेगाने धावतात. मिरची वाहतूक करणारे वाहन समोरून आल्यास इतर वाहनांना रस्त्याच्या खाली जावे लागते. यामुळे पोलिसांनी आता प्रत्येक वाहन थांबवून त्यांना ताकीद देणे गरजेचे झाले आहे.
दोन जणांचा मृत्यूमागील आठ दिवसांत देहेड येथील नवाब शहाँ तर वरुड येथील रामू वाघ या दोन तरुणांचा बळी गेला आहे. हे दोन्ही तरुण घरातील कर्ते असल्याने त्यांचे कुटुंब आता रस्त्यावर आले आहे. यापूर्वी देखील अपघाताच्या किरकोळ घटना घडल्या आहेत. मिरची वाहनांचा वेग कमी होण्याऐवजी वाढतच चालला असल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.
बक्षिसांसाठी जीवावर उदारपिंपळगाव रेणुकाई येथून मिरची लोड केल्यानंतर १७०० किलोमीटर अंतर २८ तासांत पार करणाऱ्या चालकाला १५ हजार बक्षीस दिले जाते. ३० तासात अंतर पार करणाऱ्याला १० हजार तर ३२ तासात अंतर पार करणाऱ्या चालकाला पाच हजार रुपयाचे बक्षीस व्यापाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे ट्रक चालक रस्त्यावर वाहन चालवताना केवळ बक्षिसासाठी आपला जीव गहाण ठेवून बेदरकारपणे वाहने चालवतात. मात्र, यामध्ये रस्त्यावर प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक जीवानिशी जात आहेत.
लगाम लावणे गरजेचेमिरची वाहनांचा वेग हा मर्यादेपेक्षाही अधिक असतो. त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना दोन निष्पापांचे बळी गेले आहेत. यात माझ्या घरातील एका सदस्याचा समावेश आहे. दिवसेंदिवस या घटनेत वाढ होत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देऊन वाहनधारकांना ताकीद देणे गरजेचे आहे.- सांडू वाघ, भाजपा तालुका उपाध्यक्ष.