टेंभुर्णी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता गावागावांतून कोणाला आघाडी, तर कोणाला पिछाडी याचे अंदाज बांधले जात आहे. जाफराबाद तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर आता मतमोजणीला दोन दिवसांचा अवकाश असल्याने कट्ट्यावर निकालाचा अंदाज बांधला जात आहे.
येथील १७ जागांसाठी २४ अपक्षांसह एकूण ५८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजपप्रणीत ग्रामरक्षक पॅनेलविरुद्ध राष्ट्रवादीप्रणीत ग्राम समृद्धी पॅनेल यांच्यातच झाली. आता ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात जाणार की राष्ट्रवादीच्या याबाबत कार्यकर्त्यांसह जनतेतून अंदाजाचे आडाखे बांधले जात आहे. भाजपचे वर्चस्व असलेल्या या गावात भाजपचीच एकहाती सत्ता येणार असून, या पॅनेलला १२ ते १४ जागा मिळण्याचा अंदाज अनेकजण बोलून दाखवीत आहे. तेथेच सोमवारपर्यंत थांबा आणि नंतर पाहा असे म्हणत राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्तेही ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात येणार म्हणून बोलून दाखवीत आहे. याशिवाय कोणत्या प्रभागातून कोणता उमेदवार विजयी होणार याचेही आडाखे बांधले जात आहे. यात अनेक ठिकाणी पैजाही झडत आहे. सध्या ठिकठिकाणी कार्यकर्ते हातात पेन घेऊन मतदानाची आकडेमोड करण्यात मग्न दिसत आहे. आपल्या उमेदवाराची हवा गूल झाली असली तरी आपले सीट आजच निघाले म्हणून काही ठिकाणी कार्यकर्ते उमेदवाराला उसणं अवसान देत आहे. पक्षाचे कार्यकर्ते भलेही आपापल्या पक्षाची सत्ता स्थापन होणार म्हणून दावे करीत असले तरी सामान्य जनतेतेतून मात्र ग्रामपंचायतीत भाजपचीच सत्ता येणार म्हणून बोलले जात आहे.