राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराच्या मध्यवर्ती भागात पालिकेच्या मालकीचे असलेले महात्मा फुले मार्केट पाडून तब्बल आठ वर्षे उलटून गेली आहेत. पालिकेने याचे बांधकाम स्वत: करावे ही राज्य शासनाची भूमिका, तर बीओटी किंवा पीपीपी तत्त्वावर मार्केटची उभारणी करावी, अशी लोकप्रतिनिधींची भूमिका असल्याने याच्या कामाला अद्याप मुहूर्त मिळू शकलेला नाही. एकूणच लोकप्रतिनिधींची चालढकल आणि प्रशासनातील निर्ढावलेल्या अधिका-यांमुळे शहर दिवसेंदिवस बकाल होत आहे.या मार्केटमुळे पालिकेलाही चांगले उत्पन्न मिळत होते. इमारतीचे आयुष्यमान संपल्याचे सांगत याच्या पुनर्निर्माणाचा घाट घातला गेला. शहराच्या मध्यवर्ती भागात पालिकेच्या मालकीची ही जागा असल्याने याचा विकास पालिकेने स्वत: करावा, अशा नगर विकास खात्याच्या सचिवांच्या सूचना होत्या. त्यासाठी यूडीआयएसएसएम टी या योजनेंंतर्र्गत पालिकेला ८७ लाखांचा निधीही देण्यात आला. मात्र, तत्कालीन पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत, ही इमारत बीओटी अथवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या तत्त्वावर बांधण्याची भूमिका घेतली. कुठलेही नियोजन न करता पूर्वीची इमारत पाडण्यात आली. त्यानंतर लोकप्रतिनिधी व अधिकारी संगीतखुर्चीप्रमाणे बदलत गेले आणि इमारतीचे काम रखडत गेले. परिणामी आठ वर्षांनंतरही या इमारतीच्या कामास प्रारंभ होऊ शकलेला नाही. तर दुसरीकडे हा परिसर बकाल झाला आहे.शहरातील महात्मा फुले मार्केटचे पुनर्निर्माण करण्यासाठी २००६ मध्ये हालचाली सुरु झाल्या. नकाशे आणि इमारती बांधकामाचे अंदाजपत्रक तयार आहे. पण चालढकलपणाच्या भूमिकेमुळे ही इमारत पूर्ण होऊ शकलेली नाही. एकीकडे शहरातील खाजगी व्यापारी संकुले झपाट्याने आकार घेत असताना, पालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे फुले मार्केटचे भिजत घोंगडे कायम आहे. हेतूपुरस्सर या इमारतीचे काम अपूर्ण ठेवण्यात येत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
फुले मार्केटचे काम का रखडले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:20 AM