वडीगोद्री (जालना) : सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल घेतली नसून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यपाल देत नाहीत तोवर आपण उपोषणातून माघार घेणार नाही, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिला आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे आमरण उपोषण सुरू आहे. शनिवारी आमरण उपोषणाचा तिसरा दिवस होता. आमरण उपोषणामध्ये मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे आमरण उपोषणास बसले आहेत.सरकारला ओबीसींची कसलीही गरज नाही
सरकारला ओबीसींची कसलीही गरज नाही तमा नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यामुळे त्यांची जी बदनामी झाली होती ती बदनामी झाकण्यासाठी त्यांनी मनोज जरांगेंना समोर करून आंदोलन सुरू केले असा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. आमचे आंदोलन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इशाऱ्यावर चालणार नाही असेही उपोषणकर्ते वाघमारे म्हणाले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी ओबीसी बचाव आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड, परळी, परभणी, धाराशिवसह राज्यभरातून ओबीसी बांधव वडीगोद्री येथे आले होते. यामुळे आंदोलनस्थळी समाजबांधवांची गर्दी दिसून आली आहे.
हायकोर्टातील वकिलावर राज्य सरकार दबाव टाकतय : टी. पी. मुंडे
शिंदे समितीने दिलेल्या ५७ लाख कुणबी नोंदीविरोधात आम्ही केलेल्या याचिकेवर हायकोर्टातील वकिलांवर सरकार दबाव टाकत असल्याचा आरोप ओबीसी नेते टी. पी. मुंडे यांनी केला आहे. या दबावामुळे सध्या दिल्लीवरून वकील आणल्याचेदेखील ते म्हणाले, दरम्यान आंदोलनाच्या नावाखाली पैसे घेतल्याचा संशय जरांगेनी व्यक्त केला आहे. त्या लोकांची नावे मनोज जरांगेंनी जाहीर करावीत अशी मागणी टी. पी. मुंडे यांनी केली आहे. वडीगोद्री येथील उपोषणाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे मुंडे यांनी सांगितले.