जालना : विधानसभा निवडणुकीत लढायचे की पाडायचे, याचा अंतिम निर्णय समाजाला विचारून घेतला जाणार आहे. त्यासाठी २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान राज्यातील मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे. तत्पूर्वी १७ ऑक्टोबर रोजी समाजाकडून अर्ज करणाऱ्या इच्छुकांशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिली. अर्ज केलेल्यांनी निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे काढून ठेवावीत. लढायचे ठरले तर ऐनवेळी धावपळ होणार नाही, असेही ते म्हणाले.
महामंडळांची घोषणा आणि योजना हा केवळ दिखावा आहे. १८ पगडजाती कोणासोबत आहेत, ते तुम्हाला लवकरच कळेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतील, असे आम्ही पूर्वीपासून म्हणत होतो; परंतु त्यांना काेणी काम करू दिले नाही, हे माहिती नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण मिळू दिले नाही. त्यांच्या डोक्यात वेगळे प्लॅनिंग होते. ते प्लॅनिंग आपण २० तारखेच्या बैठकीत सांगणार आहोत. भाजपने रचलेले षड्यंत्र फेल करणार आहोत, असेही जरांगे म्हणाले.