जालना : छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीसाठी जालना जिल्हा प्रशासनाने सुमारे २०० कोटींचे प्रस्ताव तयार केले आहेत. यात मुख्यत्वे जिल्ह्यात रेशीम प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, अंबड येथील मत्स्योदरी मंदिर परिसराच्या विकासासह जालना शहरात सीसीटीव्हीसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ करणे, प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची गरज आहे.
जिल्ह्यात रेशीम शेतीला सुगीचे दिवस आले आहेत. परंतु, येथे रेशीमवर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्याने येथे उत्पादित झालेल्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी इतर शहरांमध्ये पाठविण्यात येतो. रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी येथे रेशीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. तसेच, शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. रेशीम पार्क आणि प्रशिक्षण केंद्रासाठी २५ कोटींची मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे.
शहरात सीसीटीव्ही कॅमेरेकेंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत राज्यातील काही शहरांमध्ये आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याच धर्तीवर जालना शहरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी पाच कोटींच्या निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. परंतु, ते कालबाह्य झाल्याने नवीन कॅमेरे बसवण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.
जल शुद्धीकरणासाठी निधीची गरजजायकवाडी येथून जालना शहरात आलेल्या जलवाहिनीच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच, जाफराबाद, भोकरदन शहरांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना, मोतीबाग सुशोभीकरण, घनकचरा प्रकल्प, रस्ते रुंदीकरण यासाठी निधी मिळण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
मनोरुग्णालयाची घोषणा हवेतमनोरुग्णांना स्थानिक पातळीवर उपचार मिळण्यासाठी काही वर्षांपूर्वी येथे आधुनिक मनोरुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, रुग्णालय उभारण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीत मनोरुग्णालयास निधी मिळेल अशी आशा आहे.
मंदिर विकासासाठी निधीची गरजअंबड येथील मत्स्योदरी मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झालेली आहे. राज्यातील विविध भागांतून येथे भाविक दर्शनसाठी येत असतात. परिसरात भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. निधी मिळण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे.
सिंचन प्रकल्पाची क्षमता वाढजालना जिल्ह्यात लहान-मोठे असे ६४ जलसिंचन प्रकल्प आहेत. यातील अनेक प्रकल्पांची क्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. या प्रकल्पांची क्षमता वाढवण्याची गरज निर्माण झालेली आहे. सिंचनाचा अनुशेष असल्याने या प्रकल्पांची क्षमता वाढ करण्यासाठी अपेक्षित निधी मिळू शकलेला नाही.
शेतकरी एमआयडीसीचा प्रस्तावपरतूर तालुक्यातील आष्टी येथे शेतकरी एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार आहे. शेतकरी औद्योगिक क्षेत्रासाठी निधीची तरतूद झाल्यास येथील शेतकऱ्यांच्या मालावर स्थानिक स्तरावर प्रक्रिया करणे शक्य होईल.