जालना : चित्रपटात टायगर श्रॉफसोबत काम देतो म्हणून येथील एका युवतीची फसवणूक करणाऱ्या तोतया डायरेक्टरला नाशिकमधून अटक करण्यात आली. त्याच्याकडून कारसह गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ऐशोआरामातील जीवनशैली जगण्यासाठी त्याने आतापर्यंत अनेकांना गंडविले आहे.
रॅम्बो चित्रपटात काम देतो म्हणून साडेचार लाख रुपये घेवून एकाने फसवणूक केल्याची तक्रार येथील प्राजक्ता ढाकणे या युवतीने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सुनील बोरा (डारेक्टर इम्पक्ट फिल्म अॅण्ड प्रा.लि.) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीच्या शोधात पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, फुलचंद गव्हाणे, कृष्णा तंगे यांचे पथक नाशिकला गेले. पोलिसांनी आरोपीच्या घरावर २८ तास पाळत ठेवून त्यास शनिवारी रात्री ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले मूळ नाव हर्षद आनंद सपकाळ उर्फ हॅरी सॅप, असे सांगितले. सुनील बोरा नावाने तरुणीशी संपर्क करून पैसे घेतल्याची कबुली दिली. रविवारी त्यास येथील न्यायालाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत, उपनिरीक्षक जयंसिंग परदेशी, फुलचंद गव्हाणे, कृष्णा तंगे यांनी ही कारवाई केली.
मॉडलिंग शोमधून उकळायचा पैसेसंशयित आरोपी नाशिक शहरात हॅरी सॅप नावाने प्रसिद्ध आहे. सोशल मिडियावर त्याचे याच नावाने अकाऊंट आहे. मॉडलिंग करणाऱ्या तरुण-तरुणींना फसविण्यासाठी मेगा मॉडलिंग शो आयोजित करत होता. शोसाठी इंट्री फीसबरोबरच प्रथम क्रमांक देण्यासाठी पैसे उकळणे, तसेच चित्रपटात काम देण्याचे अमिष तो तरुणींना दाखवत असे. फसवणूक करून मिळविलेल्या पैशातून महागड्या हॉटेल्समध्ये ऐशोआरात राहणे, पबध्ये जाणे, अशा प्रकारची हायप्रोफाई जीवन शैली तो जगत होता. त्याच्यावर वर्धा, जळगाव व अन्य ठिकाणी अशाच प्रकारे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.