वडीगोद्री/ शहागड : मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्यासह आंदोलने करण्यात आली. यादरम्यान ४२ युवकांनी बलिदान दिले. तरी शासनाकडून अद्याप समाजाचे प्रश्न मार्गी लावले जात नाहीत. बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत. त्यामुळे शासन आणखी मराठा समाजातील युवकांच्या बळी जाण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षण मिळण्यासाठी बलिदान दिलेल्या ४२ शहिदांच्या कुटुंबीयांनी २० दिवसांपूर्वी विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण केले होते. त्यानंतर बलिदान दिलेल्या कुटुंबीयांच्या विविध मागण्यासंदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या दोन वेळा बैठका होऊनही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. सरकारला अजूनही मराठा आरक्षणासाठी तरुणांचे बळी हवे आहेत का, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत शासनाला देण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४२ कुटुंबीयांच्या मागण्या २८ सप्टेंबरपर्यंत मंजूर न केल्यास २९ सप्टेंबर रोजी शहागड (ता. अंबड) येथील गोदावरी नदीच्या उड्डाणपुलावरून उडी घेऊन जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.