जालना : जिल्ह्यातील गायरानधारकांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्या नावे करण्यात याव्यात, ही खूप वर्षांपासूनची मागणी होती; परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. भविष्यात जिल्हाभरातील गायरानधारकांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी भूमिका राष्ट्रीय निवारा परिषदेचे प्रमुख डी.डी. गायकवाड यांनी मांडली.
राष्ट्रीय निवारा परिषदेचे प्रमुख डी.डी. गायकवाड हे मंगळवारी जालना येथे आले असता त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून आतापर्यंत गायरान जमिनी नावावर करण्यात आल्या नाहीत. शासनाकडून एकप्रकारे गाजर दाखवण्याचे काम करण्यात येत आहे. जोपर्यंत गरीब-वंचितांच्या गायरान जमिनी नावावर होत नाही, तोपर्यंत संघटना पाठीमागे हटणार नाही. यासाठी वाटेल ते करावे लागले तरी चालेल. संघटनेच्या माध्यमातून स्थलांतरित मजूर भाडेकरूंना शासनाने भूखंड देऊन पुनर्वसन करावे, लाइटहाउसच्या धर्तीवर गृहनिर्माण सोसायट्या तयार कराव्यात, अशा मागण्या करून आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून गायरान प्रश्न, भाडेकरूंना हक्काचे घर यासह अनेक गरीब-वंचितांचे प्रश्न सोडवण्यावर संघटनेचा भर असल्याचे डी.डी.गायकवाड म्हणाले.
यावेळी मराठवाडा प्रमुख संतोष तुपसौंदर, जिल्हाध्यक्ष पैत्रज भालेराव आदींची उपस्थिती होती.