भोकरदन : तालुक्यातील आडगाव भोंबे येथे पोलिसांनी सोमवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान कारचा पाठलाग करत मध्यप्रदेशातून जालनाकडे अवैधरित्या येणारा चार लाखांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोमवारी सायंकाळी पारध पोलीस ठाण्याचे सपोनि चैनसिंग घुसिंगे यांना गुप्त माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातून एका कारने (एम.एच.०१,बी.के.१४३२) अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी डॉ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि घुसिंगे यांनी त्यांचे सहकारी शिवाजी जाधव, जीवन भालके आणि नितेश खरात यांच्यासह गोद्री ते धावड्याकडे येणाऱ्या रस्त्यावरील एका हॉटेल जवळ दबा धरून बसले. सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास कार येताच पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने कार धावडाकडे भरधाव वेगाने नेली. पोलिस पथकाने लागलीच कारचा पाठलाग केला.
दरम्यान, धावडा येथील समतानगर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबलेल्या काही लोकांना धडक देऊन कार शिवणा (छ.संभाजीनगरनगर)कडे भरधाव वेगाने निघून गेली. पोलिसांनी पाठलाग करत ग्रामस्थांच्या मदतीने शिवाना ते अन्वा मार्गावरील आडगाव भोंबे (ता.भोकरदन ) येथे कार अडवली. कारची झडती घेतली असता त्यात चार लाखांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी शेख अमेर शेख बाबा आणि शेख आमेर शेख सिराज ( दोघे रा. काझी मोहल्ला,भोकरदन ) यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. या कारवाईत गुटख्यासह एकूण १८ लाख,९२ हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून पारध पोलीस ठाण्यात जमा केला.