डोणगाव या गावाची लोकसंख्या जवळपास चार हजारांपेक्षा अधिक असून, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या चार सार्वजनिक विहिरींच्या माध्यमातून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. तसेच गावात १० हातपंप देखील आहेत. परंतु, हे हातपंप नादुरूस्त असून, नळ जोडणीही फक्त शोभेची वस्तू बनलेली आहे. २००३ मध्ये गावाची पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सावखेड भोई या तलावातून एक कोटी रुपये खर्च करून पाणी आणले. या तलावात सध्या पाणी मुबलक आहे. परंतु, स्थानिक प्रशासनाकडून पाणी सोडण्यात येत नाही.
उन्हाळा आला की, फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाईला सुरुवात होते.
दरवर्षी हीच परिस्थिती असल्याने ही पाणीटंचाई कायमस्वरूपी मिटविण्यासाठी प्रशासनाकडून ठोस निर्णय घेतले जात नाही. गावातील अनेक नागरिक शेतातून बैलगाडीद्वारे पाणी आणत आहेत.
मात्र, ज्यांच्याकडे शेतीच नाही, त्यांना दोन ते तीन किलोमीटर पायपीट करीत जावे लागत आहे.
मी गावाला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून वारंवार ग्रामसेवकांना विनवण्या केल्या. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामसेवक कार्यालयात जास्त येत नाहीत. याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
राजू घोडके, ग्रामपंचायत सदस्य. डोणगाव