लोकमत न्यूज नेटवर्कपारध : दारू दुकानाला परवानगी देण्यासाठी ग्रामपंचायतीने दिशाभूल करीत महिलांच्या स्वाक्ष-या घेतल्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गावातील दोनशेहून अधिक महिलांनी ग्रामपंचयात कार्यालयावर धडकल्या. संतप्त झालेल्या महिलांनी कार्यालयाला कुलूपच ठोकले.गावात १५ आॅगस्ट रोजी ग्रामसभेत नवीन देशीदारू दुकान परवाना देण्यात आला. तसा ठरावही घेण्यात आला. परंतु दारू दुकानाला परवाना देण्याच्या ठरावाचे वाचन न करताच ग्रामपंचयातीने उपस्थित महिलांच्या स्वाक्ष-या घेतल्या. ग्रामपंचायतीने दिशाभूल केल्याचा आरोप करत गावातील संतप्त महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावले. यापूर्वी महिलांनी ग्रामपंचायतीला जाब विचारू, असे सांगून दवंडी दिली होती. सुमारे २०० महिला ग्रामपंचायतीसमोर एकत्र आल्या. यावेळी ग्रा.पं. कार्यालयात सरपंच, ग्रामसेवक उपस्थित नव्हते.दरम्यान, सरपंच, ग्रामसेवक व अन्य सदस्य यांनी पारध पोलीस ठाण्यात महिलांचे नेतृत्व करणा-या प्रकाश पवार यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. सायंकाळी पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रा.पं.मध्ये पंचनामा केला. याबाबत पारध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
महिलांनी ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:37 AM