लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगाव येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तहसील प्रशासनाकडे तीन महिन्यांपासून पाठपुरावा करुनही गावात पाण्याची सुविधा न केल्याने संतप्त महिलांनी बुधवारी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.वडीरामसगाव येथे गेल्या तीन महिन्यांपासून पाणी टंचाई आहे. गावात टँकरने पाणी पुरवठा करावा असा प्रस्ताव ग्रामसभेने तहसीलदार संजयकुमार ढवळे यांच्याकडे दिला होता. मात्र ढवळे यांनी प्रस्ताव पुढील कार्यवाईसाठी उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठविलाच नाही. यामुळे यामुळे गत तीन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे गावात टँकर सुरु करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी हदगल यांनी तहसीदारांना दिल्या होत्या याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांत संताप आहे. याच संतापाचा उद्रेक बुधवारी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन करुन निषेध केला. पाणी आमच्या हक्काचे.. नाही कुणाच्या बापाचे...तहसीलदार संजय ढवळे यांचा निषेध असो, या तहसीलदाराचे करायचे काय.. खाली मुंडके वर पाय, संजय ढवळे हाय हाय... अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनकर्त्यांची कुणकुण लागल्याने तहसीलदार दिवसभर आपल्या कार्यालयात फिरकलेच नाहीत. यामुळे आंदोलनकत्याचा चांगलाच पारा चढला. आंदोलकांनी तहसीलदार संजय ढवळे यांची खुर्ची उलटी ठेवून निषेध केला. टँकर सुरु केल्याशिवाय येथून उठणार नाही, अशी भूमिका घेतली. जि.प. सदस्य जयमंगल जाधव, पं. स. सदस्य पंडित धाडगे, भागवत रक्ताटे, भास्कर वराडे यांच्यासह महिला व ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक आर.बी.सोनवणे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचा-यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी नायब तहसीलदार संदीप मोरे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो असफल राहिला.तालुक्यात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचा दौरा असल्याने तहसीलदार संजय ढवळे दौ-यात होते. तहसील कार्यालयात ग्रामस्थांनी पाण्यासाठी आंदोलन सुरु केल्याची माहिती ढवळे यांना लागताच तहसीलदार आपल्या कार्यालयाकडे दिवसभर फिरकलेच नाहीत. परंतु कार्यालयात न येता दुसरीकडे थांबून पाण्याच्या टँकर प्रस्तावावर सही करुन देतो, असा निरोप तहसीलदारांकडून गेल्यानंतर आंदोलनकर्त्यानी आपले आंदोलन मागे घेतले. कर्मचा-यांच्या हस्ते प्रस्ताव मागवून तहसीलदार संजय ढवळे यानी टँकरच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. यावेळी नायब तहसीलदार संदीप मोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. परिसरात अपुºया पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांत सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे टँकर सुरु करण्याची मागणी वाढली आहे.
महिलांचा घनसावंगी तहसीलवर ठिय्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:56 AM