लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : वडिलांची जमीन नावावर करून देण्यासाठी लाच घेताना महिला तलाठ्यास मंगळवारी दुपारी अंबड येथे रंगेहाथ पकडण्यात आले.तालुक्यातील कुक्कडगाव येथील रहिवासी तक्रारदाराच्या वडीलांच्या दोन हेक्टर पैकी एक हेक्टर जमीन स्वत:च्या तर एक हेक्टर जमीन पत्नीच्या नावावर करायची होती. यासाठी तक्रारदाराने सुखापूरी सजाच्या तलाठी पुष्पा हरी सानप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वडिलांची जमीन मुलाच्या व सुनेच्या नावावर करण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच मागितली. फेरफार करण्यासाठी आपण सर्व कागदपत्रांची पुर्तता केली असून फेरफार करण्यासाठी एवढे पैसे देण्यास असमर्थ असल्याचे तक्रारदाराने सांगितल्यावर शेवटी ११ हजार रूपयांवर तडजोड निश्चित झाली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जालना येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाशी संपर्क साधला. पुष्पा सानप यांनी लाच मागितल्याची खात्री झाल्यावर सानप विरोधात सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी अंबड शहरातील तहसील कार्यालयाच्या पाठीमागे सानप यांच्या खोलीवर तक्रारदाराकडून ११ हजार रुपयांची लाच घेताना पुष्पा सानप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. सानप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोउपनि. रवींद्र निकाळजे, पोनि. आजिनाथ काशिद, व्ही. एल. चव्हाण, कर्मचारी टेहरे, धायडे, प्रदीप दौंडे यांनी केली.
लाच घेताना महिला तलाठ्यास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:56 AM