पारध : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील दारूचे दुकान बंद करावे, या मागणीसाठी महिलांनी एल्गार पुकारला आहे. गुरुवारी दुपारी शेकडो महिलांनी दारूच्या दुकानासमोरच ठिय्या मांडला. महिलांच्या आक्रमक पवित्र्यामुळे दारू दुकानदारांचे धाबे दणाणले.येथे देशी दारूची दोन व विदेशी दारुचे परवानाधारक दुकान वीस वर्षांपासून सुरु आहे. या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. हे प्रकार थांबावेत म्हणून येथील महिलांनी अनेकदा ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, तसेच जिल्हाधिका-यांना निवेदने दिली. ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठरावही घेतला. मात्र प्रत्यक्षात दारूबंदी झालीच नाही. परिणामी दारू पिऊन वाद घालणे, भुरट्या चो-या इ. प्रकार वाढत असल्याने गुुरुवारी महिलांच्या भावनांचा उद्रेक झाला. सकाळी अकराच्या सुमारास महिलांनी एकत्र येऊन दारूविक्रीस मज्जाव केला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून दारू विक्रेत्यांनी पारध पोलिसांना पाचारण केले. मात्र, या महिलांनी पोलिसांना देखील दाद दिली नाही. सायंकाळपर्यंत दोन्ही दुकानांसमोर शेकडो महिला जमा झाल्या. विशेष म्हणजे रात्री देखील येथेच थांबण्याचा निर्णय या महिलांनी घेतला. त्यासाठी मंडप टाकण्यात आला. दारूविक्रीचे दुकान कायमचे बंद होत नाही, तोपर्यंत येथून हटायचे नाही, असा निर्धारच या महिलांनी केला. रात्री उत्पादन शुल्क विभागाचे पथकही गावात दाखल झाले होते. महिलांनी दारूबंदीचा रीतसर ठराव जिल्हाधिका-यांकडे सादर करावा. त्यानंतर गावातील दारूबंदीबाबत योग्य कार्यवाही केली जाईल, असे उत्पादन शुल्क विगाचे निरीक्षक प्रवीण ठाकूर यांनी सांगितले.
दारूबंदीसाठी पिंपळगाव रेणुकाईत महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:05 AM