बदनापूर (जालना ) : एसटी महामंडळाच्या भरारी पथकास बनावट पासद्वारे एक महिला बसमधून प्रवास करताना आढळून आले. यावरून ती महिला व तिला पास देणारा तिचा पती यांच्या विरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनिता गणेश केळकर व गणेश विश्वनाथ केळकर असे आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास जालना ते औरंगाबाद दरम्यान बदनापूरजवळ जालना आगाराच्या मार्ग तपासणी पथकाने जालना ते सिडको या विनावाहक एसटी बसची ( क्र एमएच-२० डि-९८०८ ) तपासणी केली. यावेळी वनिता गणेश केळकर या प्रवासी शिवशाही बससाठी ग्राह्य असलेल्या 'आवडेल तेथे कोठेही प्रवास' या पासद्वारे प्रवास करत होत्या. पथकास तपासणीवेळी पासवर दि १४-६-१९ ला परतूर येथील वाहतुक नियंत्रकांनी दि १८-६-१९ ते २१--६-१९ पर्यंत दिल्याचा उल्लेख आढळून आला. मात्र, पासचा संशय आल्याने पथकाने परतुर येथील वाहतुक नियंत्रक कक्षात भ्रमणध्वनीवरून पासबद्दल विचारणा केली. परतूर आगाराने त्यांनी असा पास दिला नसल्याचे सांगितले. पास बनावट असल्याचे आढळून येताच पथकाने वनिता यांना विचारणा केली. त्यांनी आपल्याला ही पास पती गणेश केळकर याने आणून दिल्याचे सांगितले.
यानंतर पथकातील जालना आगाराच्या सहा़वाहक निरीक्षक ज्योति अविनाश पवार यांनी बदनापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यावरून वनिता गणेश केळकर व तिचा पती गणेश विश्वनाथ केळकर ( रा सिंदखेडराजा ) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ के व्हि अंभोरे हे करत आहेत. ही कारवाई सहा़वाहक निरीक्षक ज्योति अविनाश पवार, स़वा़नि़आर व्हि गिरी, आ एस पठाण, वा़नियंत्रक शि़ल़ साबळे,एस पी भुतेकर, चालक एस एस दराडे यांच्या पथकाने केली.