जालना : जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बालरक्षकांच्या माध्यमातून साडेतीन हजार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेले कार्य, इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी असल्याचे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.शनिवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बालरक्षक आणि क्षेत्रिय अधिकाºयांच्या सहविचार सभेत ते बोलत होते.या वेळी उपसंचालक सुभाष कांबळे, सहसंचालक बाबर, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे सिद्धेश्वर वाडेकर, श्याम मकरंदपुरे, क्षीरसागर, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.दोन सत्रांत झालेल्या या सभेत पहिल्या सत्रात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी बालरक्षकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचा नंदकुमार यांनी आढावा घेतला. या वेळी जिल्हाभरातून आलेल्या बालरक्षकांनी आपले अनुभव सांगितले. ऊसतोड कामगार, व मोलमजुरीसाठी स्थलांतरित होणा-या कुटुंबातील मुलांचे शिक्षण अर्धवट सुटणार नाही, यासाठी शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम अधिक व्यापक करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. दुपारच्या सत्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची त्यांनी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांनी काय करायला हवे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना प्रत्येक संकल्पना अधिक सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी ई-लर्निंग शिक्षण पद्धतीवर भर देण्याच्या सूचना त्यांनी या वेळी संबंधित अधिका-यांना दिल्या. या वेळी शिक्षणाधिकारी पांडुरंग कवाणे, एम. के. देशमुख, कैलास दातखीळ, डायटचे प्राचार्य जयराम भटकर, नागेश मापारी यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, बालसंरक्षक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेत जिल्ह्याचे काम पथदर्शी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:14 AM