लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाची निर्धारित लांबी मुदतीमध्ये पूर्ण न झाल्यामुळे कंत्राटदार कंपनीला प्रतिदिवस १४ लाखांचा दंड आकारण्याच्या सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवारी दिल्या आहेत.आष्टी ते परतवाडी दरम्यानच्या दिंडी मार्गाची लोणीकर यांनी अचानक भेट देवून पाहणी केली. शेगाव ते पंढरपूरमार्गे लोणार-मंठा -परतूर-आष्टी, लोणी, माजलगाव तसेच वाटूर-मंठा-परभणी या महामागार्चे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. शेगाव ते पंढरपूर हा पालखी मार्ग दोन हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत असून, परतूर मतदारसंघात या रस्त्याची लांबी ९५ किलोमीटर आहे. मेगा इंजिनियरिंग व इन्फ्रा कंपनी हैदराबाद या कंपनीमार्फत हे काम करण्यात येत आहे. आॅगस्ट २०१७ मध्ये सुरू झालेले हे काम मार्चअखेर २० किलोमीटर होणे अपेक्षित होते. परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्याने कंपनीला आठ एप्रिलपासून १४ लाख रुपये प्रतिदिवस या प्रमाणे दंड आकारण्याच्या सूचना लोणीकर यांनी महामंडळाचे कार्यकारी अभियंता जाधव यांना दिल्या. कामावरील यंत्रसामुग्रीच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना त्यांनी कंपनीच्या अधिका-यांना दिल्या. यावेळी सहायक अभियंता सुरजित सिंह, मेघा इंजिनिअरिंगचे चंद्रशेखर मधू, आष्टी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक इज्जपवार, तालुकाध्यक्ष रमेश भापकर, रामेश्वर तनपुरे आदींची उपस्थिती होती.
शेगाव-पंढरपूर मार्गाचे काम संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 1:12 AM