लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर तालुक्यातील विविध गावांचे टेंडर रद्द करुन ती कामे दुष्काळग्रस्त शेतमजुरांना उपलब्ध करुन द्यावा या मागणीसाठी सोमवारी शेतमजूर आणि महिलांना येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात पाच तास ठिय्या आंदोलन केले. मजुरांच्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता.तालुक्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. शेतीचे काम तीन महिन्यांपूर्वीच संपुष्टात आल्याने कामाविना मजुरांचे हाल सुरु आहे. कामानिमित्त परिसरात स्थलांतर वाढले आहे. मागील सहा महिन्यांपासून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती, मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.विशेष म्हणजे पंचायत समिती, तहसील, जि.प. जिल्हाधिकारी कार्यालयावर मजुरांनी मोर्चा काढून आंदोलन केले होते. तालुक्यात कामे उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र परिसरात अद्यापही कामे सुरु झालेली नाहीत. या निषेधार्थ मजुरांनी पाच तास आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध केला. ग्रामीण जनता उपाशी मरत असताना तालुका कृषी अधि कारी व कृषी सहायक अकुशल काम जेसीबी ला देऊन कामाची मागणी करणाऱ्या दुष्काळग्रस्त जनतेला उपाशी मारण्याचे काम करत आहेत. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन परिसरात रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्याची मागणी केली. यावेळी सरिता शर्मा, विजय कोळे, दिनकर काळे विजय गायकवाड गणेश गिरी नामदेव बालकुंड, शे. शकीला, दत्ता बोडके आदी उपस्थित होते.
मनरेगातून कामे मिळण्यासाठी मजुरांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:39 AM