येथील एसआरजे उद्योगसमूहाच्या श्री ओम स्टीलच्या वतीने त्यांच्या कंपनीच्या सभागृहात शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री ओम स्टीलमध्ये आज रक्तदान शिबिर पार पडले. या पार पडलेल्या रक्तदान शिबिरास कामगार तसेच युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. राज्यात भासत असलेला रक्ताचा तुटवडा भरून निघावा यासह गरजू रुग्णांना रक्त वेळेवर मिळावे यासाठी लोकमतने २ ते १५ जुलैदरम्यान ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत महारक्तदान शिबिरांचे आयोजन जिल्हाभर केले आहे. हे रक्तदान शिबिरं स्वातंत्र्य संग्रामसेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवारी प्रारंभी एसआरजे स्टील उद्योगसमूहाच्या श्री ओम स्टीलच्या वतीने त्यांच्या एमआयडीसीतील कंपनीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. याचा शुभारंभ माजी मंत्री तथा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपजिल्हाप्रमुख पंडित भुतेकर, काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंट्याल, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जालन्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, चंदनझिरा ठाण्याचे निरीक्षक यशवंत जाधव, कैलास गोरंट्याल सोशल क्लबचे अध्यक्ष गणेश चौधरी, सामजिक कार्यकर्ते चितळकर, एसआरजे स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पित्ती, संचालक रवींद्र पित्ती, पवन गर्ग, काँग्रेसचे नगरसेवक गणेश राऊत, प्रदीप खैरे, रोहित मानधनी, भरत तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत सुरेंद्र आणि रवींद्र पित्ती यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
चौकट
लोकमतचा स्तुत्य उपक्रम
लोकमत वृत्तपत्र समूहाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून एक मोठे काम राज्यात हातात घेतले आहे. त्यांच्या या आवाहनाला शिवसेनेचीही साथ आहे. आपण स्वत: यासाठी पुढाकार घेत असून, जास्तीत जास्त युवकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करत आहे. ‘लोकमत’ने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे.
अर्जुन खोतकर, माजी मंत्री
चौकट
लोकमतच्या उपक्रमास सॅल्यूट
‘लोकमत’ने संपूर्ण राज्यात रक्ताचं नातं या माध्यमातून महारक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. आज कोरोनाकाळात रक्ताचा प्रचंड तुटवडा असून, ही बाब लक्षात घेऊन एकाचवेळी संपूर्ण राज्यात यासाठी पुढाकार आपण प्रथमच पाहत आहोत. त्याामुळे एखादे वृत्तपत्र एवढा मोठा कार्यक्रम घेत असल्याने त्यांच्या या उपक्रमास आपला सॅल्यूट राहील.
भास्कर अंबेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख, जालना
चौकट
‘लोकमत’च्या पुढाकाराने आपण भारावलो
कोरोनाकाळात प्रामुख्याने फ्रंटलाइन वर्कर्स तसेच डॉक्टर, परिचारिका तसेच प्रत्येक घटकाने मोठे योगदान दिले आहे. आज कोरोना रुग्णांचे आकडे कमी असले तरी तो संपूर्णपणे संपलेला नाही. यापासून दूर राहण्यासाठी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतराचा नियम पाळण्यासह कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यावर भर देण्याची गरज आहे. या महामारीच्या काळात अनेकांनी त्यांना जमेल तशी मदत केली. त्यातच सलग पंधरा दिवस लोकमतने रक्ताची गरज आणि तुटवडा लक्षात घेऊन रक्ताचं नातं अंतर्गत जो पुढाकार घेतला आहे, त्यामुळे आपण भारवलो असून, आपणही यात सर्व ती मदत करणार आहोत.
अक्षय गोरंट्याल, युवा नेता, काँग्रेस, जालना
चौकट
स्टील ऑन व्हील करणार जागृती
एसआरजे उद्योगसमूहाच्या श्री ओम स्टीलने लोकमतच्या रक्ताचं नातं या उपक्रमांतर्गत संपूर्ण राज्यभर सुरू असलेल्या शिबिरांची जनजागृती करण्यासाठी स्टील ऑन व्हील या १३ व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. शहर आणि ग्रामीण भागात फिरून या व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांना रक्तदानासाठी पुढाकार घेण्यासह सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्याचे लोकार्पणही शनिवारी माजी मंत्री अर्जुन खेातकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.
चौकट
कालिका स्टीलमध्येही मोठा प्रतिसाद
जालना येथील एमआयडीसीतील कालिका स्टीलमध्ये लोकमतच्या रक्ताचं नातं या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी कालिका स्टीलचे संचालक घनश्याम गोयल, संचालक अरुण अग्रवाल, अनिल गोयल यांनी मोठी मदत केली. शनिवारी झालेल्या रक्तदान शिबिरास कालिका स्टीलमधील कर्मचारी तसेच कामगारांनी हरिरीने सहभाग घेतला. यावेळी रक्तदात्यांचे प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी अतुल परमान, सुनील सोनी, अमोल देशमुख आदींसह अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.