लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांची गुरूवारी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी व कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळी, हुमणी अळी आदीसाठी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली़सद्या स्थितीत ८ ते १० जून २०१९ दरम्यान पेरणी झालेल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रार्दुभाव आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमार्फत या अळीबाबत कोणती औषधे फवारणी करावी व अळी नियंत्रणासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.यामध्ये मार्गदर्शन करताना जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे म्हणाले, मका पिकावर लष्करी अळीसाठी जैविक औषधांचा वापर करून शेतकऱ्यांचा खर्च कसा कमी करण्यात येईल याकडे लक्ष द्यावे. त्याकरीता उगवणीनंतर ३ ते ४ आठवडे पर्यंत १५०० पिपिएमचे किंवा घरी तयार केलेले ५ टक्के लिंबोळी अर्क किंवा मेटा हायजियम अॅनिसोप्ली ४० ग्राम किंवा नोमुरिया रिलाई ४० ग्राम किंवा बॅसिलस थुरीन्जिएन्सिस २० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी द्यावे.लष्करी अळी ही मका पिकावर व शेतक-यांवर आलेली आपत्ती आहे. यासाठी एकात्मिक उपाययोजना करण्याची गरज असून कृषी सेवा केंद्र संचालकांनी शेतक-यांना योग्य ते मार्गदर्शन करून शेतक-यांना अनावश्यक खर्चापासून वाचवावे व शेतक-यांच्या उत्पन्नासाठी हातभार लावावा़ जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, जालना या तालुक्यात मका पिकाचा पेरा वाढला आहे.पीक वाचविण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज आहे़ या अळीच्या नियंत्रणासाठी भौतिक, यांत्रिक व जैविक पध्दतीचा वापर करावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.या कार्यशाळेत जिल्हागुणनियंत्रक सायप्पा गलांडे, कृषी विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतुल लड्डा यांच्यासह कृषी विभागातील अनेक तज्ज्ञांनी लष्करी अळीच्या नियंत्रणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले़यावेळी उपस्थित कृषी निविष्ठा विक्रेत्यांना या अळींच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती असलेले पत्रक वाटप करण्यात आले. या कार्यशाळेत सर्व तालुक्यातील कृषी निविष्टा विक्रेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पिकावरील अळी नियंत्रणासाठी विक्रेत्यांची कार्यशाळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:10 AM