परिचारिकांचे महत्त्व आताच्या कोविड काळात आणखी प्रभावीपणे जाणवले. ज्यावेळी कोरोनाची लागण झाल्याची माहिती ही प्रियजनांना कळते, त्यावेळी रक्ताची नाती इच्छा असूनही जवळ येऊ शकत नाही. अशावेळी डॉक्टरांचा राऊंड झाल्यावर त्या रुग्णांची सर्वस्वी काळजी या परिचारिका म्हणजेच नर्स घेतात. हे सर्व करत असताना त्या सीमेवरील जवानाप्रमाणे आपले प्राण तळहातावर घेऊनच कोरोना रुग्णांची सेवा करतात. कधी संसर्ग होईल हे सांगत येत नाही; परंतु संसर्ग होईल या भीतीने त्यांनी कधीच रुग्णांना वाऱ्यावर सोडले असे कधीच घडले नाही.
आज गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे सर्व जण घरबंद झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे आकडे हे सर्वसामान्यांची झोप उडवत आहेत. अशाही स्थितीत परिचारिका या मोठ्या हिमतीने रुग्णसेवेला प्राधान्य देतात. वर्षभरापूर्वी जालन्यात पहिला कोरोना रूग्ण म्हणून एक महिला आढळली होती. त्यावेळी त्यांची घेतलेली काळजी ते आतापर्यंत कोविड रुग्णालयात सुरू असलेले कर्तव्यपालन हे सर्व जालनेकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयातही परिचारिकांचे कर्तव्य हे सॅल्यूट करणारेच आहे.
कोविडमध्ये या परिचारिका बजावताहेत कर्तव्य
कोविड हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षभरात कोरोना रुग्णांची काळजी घेण्यासाठी सर्वच परिचारिका आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यात प्रामुख्याने प्रमुख परिचारिका म्हणून ज्योती भूरमुडे, एस. एल. पंडित, कडू पाटील, शिल्पा सानप, अनुजा जाधवर, अनिता चव्हाण, मंगल खडे, मंगल राऊत, सुनीता मोरे, वासंती खनगे, अनुजा दाणी, अनिसा सिध्दीकी, शीतल सरदार, सीमा भालतिलक, तेजस्विनी बहुरे आदींचा समावेश आहे.