जालना : कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. परिणामी आरोग्य विभागाच्या वतीने वर्षांतून दोन वेळेस राबविली जाणारी जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम थंडावली आहे. जंतनाशक गोळ्यांचे वेळेत सेवन न केल्याने लहान बालकांमध्येही जंतदोष आढळून येत आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने शालेय स्तरावर वर्षातून दोन वेळेस जानेवारी व जून महिन्यांत जंतनाशक गोळ्यांचे शाळांमध्ये वाटप केले जाते. या गोळ्या नियमित मुलांना दिल्या जात असल्याने जंतदोष होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, कोरोनामुळे शाळा बंद झाल्या आणि जंतनाशक गोळ्यांचे वाटप बंद झाले. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास २८ टक्के बालकांमध्ये जंतदोष आढळत आहे.
काय आहे जंतदोष?
लहान मुलं अधिक गोड खात असल्याने त्यांना जंतदोष होतो. त्यामुळे मुलांच्या पोटात दुखण्यासह इतर त्रास असतील तर पालकांनी तातडीने बालरोग तज्ज्ञांकडे मुलांना दाखवावे. जंतनाशक गोळी मुलांना वेळेवर द्यावी.
वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या
मुलांना जंतदाेष होऊ नये यासाठी वयाच्या दोन वर्षांपासून १९ वर्षांपर्यंत नियमित जंतनाशक गोळ्या द्याव्या लागतात. यासाठी शासनस्तरावरूनही विविध शिबिरे राबवून जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते.
गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?
जंतनाशक गोळ्यांचे वाटप शासकीय रुग्णालयातून केले जाते. त्यामुळे आपल्या घराच्या जवळील प्राथमिक रुग्णालय ते जिल्हा रुग्णालयापर्यंत कोठेही गोळ्या उपलब्ध होतात.
आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप
शासनाच्या निर्देशानुसार बालकांना जंत दोष होऊ नये यासाठी वर्षातून दोन वेळेस गोळ्यांचे वाटप होते.
शाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यात व नंतर जानेवारी महिन्यात शाळांमध्ये गोळ्या दिल्या जातात.
कोरोनामुळे जंतनाशक गोळ्यांच्या वाटपावर परिणाम झाला आहे. असे असले तरी शासकीय निर्देशानुसार गोळ्यांचे वाटप करण्याचे नियोजन केले जाणार आहे. जंतनाशक गोळ्या लागत असतील तर जवळील शासकीय रुग्णालयातून घ्याव्यात.
- डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी