जालना : पंजाबमध्ये मोसंबीचे उत्पादन चांगल्या प्रमाणावर होते; परंतु जी चव जालना तसेच मराठवाड्यातील मोसंबीस आहे, तशी चव त्या भागातील मोसंबीस नसल्याचा अनुभव पंजाबच्या उद्योजकांनी व्यक्त केला. २६ ते ३० एप्रिलदरम्यान एसीआर आणि वाणिज्य मंत्रालयाने राष्ट्रीय पातळीवर आहार हे प्रदर्शन भरविले होते. आवडलेल्या चवीनंतर आम्ही तुमच्या भागात भागीदारीने मोसंबीवरील प्रक्रिया उद्योग उभारण्यास तयार असल्याचेही सांगितल्याची माहिती जालना जिल्हा फळ उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग डोंगरे यांनी दिली.
कोरोनानंतर दोन वर्षांनी हे आहार प्रदर्शन भरले होते. प्रगती मैदानावरील या प्रदर्शनात देशातील ज्या फळांना जीआय मानांकन मिळाले आहे, अशांनाही यंदा सहभागी करून घेण्यात आले होते. यात जालना जिल्ह्यातील कर्जत येथील प्रगतिशील शेतकरी पांडुरंग डोंगरे हे सहभागी झाले होते. मोसंबीसाठी त्यांनी स्वतंत्र स्टॉल दिल्याचेही डोंगरे म्हणाले. संपूर्ण देशातील विविध प्रकारचे आहार कसे आहेत, त्यांची वैशिष्ट आणि महत्त्व हे या प्रदर्शनातून मांडून यातून शेतकऱ्यांना एक प्रकारे खुल्या मार्केटिंगचे व्यासपीठच निर्माण करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. जालना जिल्ह्याचा विचार करता, आज घडीला जवळपास २७ हजार हेक्टरवर मोसंबीचे उत्पादन घेतले जात आहे; परंतु या मोसंबीवर प्रक्रिया करणारा उद्योग येथे नाही. त्यासाठी मोठी गुंतवणूक लागते. ती गुंतवणूक कोणीच करण्यास तयार नसल्याने केवळ उत्पादित मोसंबी मोंढ्यात नेऊन ती व्यापाऱ्यांना विकणे एवढेच येथे होते. हे चित्र बदलण्यासाठी या आधीदेखील आमच्या फळ उत्पादक संघाने बरेच प्रयत्न केले. त्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचेही डोंगरे यांनी सांगितले.
मोसंबीची चव चाखून अनेक जण भारावले
दिल्लीतील आहार प्रदर्शनात देश तसेच परदेशातील अनेक मोठ्या उद्योजक, निर्यातदारांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांना मोसंबी खावी कशी याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यातील आंबट-गोड चवीने पंजाब तसेच अन्य भागातील उद्योजक भारावले. त्यांनी तेथेच महाराष्ट्रातील शेतकरी भागीदारीत करार पद्धतीने प्रक्रिया उद्योग उभारणीस तयार असतील तर आम्ही त्यात निश्चितपणे गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती पांडुरंग डोंगरे यांनी दिली.