जालना : हिंदूंच्या धार्मिक सणांना श्रावण महिन्यापासून सुरुवात होते. श्रावण महिन्यात भक्तांची मांदियाळी जिल्ह्यातील विविध शिव मंदिरांत दिसून येते. श्रावण सोमवारी दर्शनासाठी मोठी गर्दी होते. परंतु, गतवर्षीपासून कोरोनामुळे मंदिरांची दारे बंद झाली आहेत. तेव्हापासून भक्तांना मंदिरे उघडण्याची आस लागली आहे. यावर्षीतरी मंदिरात प्रवेश मिळणार का ? याकडे आता भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या दीड वर्षापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाला कधी लॉकडाऊन तर कधी संचारबंदी करावी लागत आहे. शिवाय, मंदिरातही मोजक्याच भविकांना पाठविले जात आहे. गेल्या वर्षीही श्रावण महिन्यात प्रवेश मिळाला नाही. यंदा प्रवेश मिळेल का ? याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.
घरी कितीही नामस्मरण केले तरी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्यात एक वेगळाच आनंद असतो. त्यात स्वहस्ताने मंदिरात केलेली पूजाअर्चा यातून भाविकांना आत्मिक समाधान मिळते. संपूर्ण श्रावण महिन्यात भाविक भक्त पारायण करतात. त्यामुळे गर्दी असते.
मंदिरात वर्षभर कार्यक्रम असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. बेल, फुले, केळी आदी साहित्य मंदिर परिसरात मिळत असल्याने याची भाविकांकडून खरेदी केली जाते. त्या बदल्यात आम्हांला मिळत असलेल्या रकमेमुळे आमची आर्थिक बाजूही सावरण्यास मदत होते.
-अर्जुन मांगडे, व्यावसायिक
आजच्या धकाधकीच्या जीवनात भाविक मंदिर परिसरात उपलब्ध असलेले धार्मिक साहित्य घेणेच पसंत करतात. त्यामुळे आमच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटला आहे. परंतु, मंदिरे बंद असल्याने आम्हांला याचा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने याबाबत योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.
-हिरालाल जामदार, व्यावसायिक
यावर्षी ९ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होणार आहेत. या महिन्यातील सोमवारी ठिकठिकाणी उत्सव साजरे केले जातात. यामध्ये दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करणे, उपवास ठेवणे, देवाला बेल वाहणे आदींचा समावेश आहे. आता मंदिरे कधी उघडतील, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.