अंबड/जालना : नगरपालिका निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी १३ सप्टेंबरला पहाटे तीन वाजेच्या सुमारास आ. नारायण कुचे व त्यांच्या समर्थकांनी अंबड येथील चौथऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला. यावेळी पोलीस आणि आ. कुचे यांच्यासह त्यांच्या समर्थकांत परवानगीवरुन वाद झाला. त्यामुळे कुचे आणि त्यांच्या ४४ समर्थकांना पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.
पोलीस निरीक्षक अनिरूद्ध नांदेडकर आणि आ. कुचे यांच्यात परवानगीच्या मुद्यावरून वाद झाला. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिका तसेच अन्य महत्त्वाच्या परवानग्या घेतल्या आहेत, त्यामुळे आम्ही नियमबाह्य काम करत नसल्याचे समर्थकांचे म्हणणे होते. परंतु, पुतळा उभारणी समितीसह अन्य विभागांची परवानगी नसल्याचे नांदेडकर यांनी सांगितले. यावरून कुचे तसेच नांदेडकर आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली.
अटक केल्यानंतर कुचे यांच्यासह समर्थकांना शुक्रवारी अंबड येथील न्यायालयात सकाळी हजर करण्यात आले. तेथे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. नंतर आ. कुचे यांनी जामिनासाठी जालना येथील जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. कुचे यांच्यासह अन्य ४४ जणांची जामिनावर सुटका केली.