आष्टी : जलसंपदामंत्री जयंतराव पाटील साहेबांपर्यंत लिंक आहे. बाधित क्षेत्रासाठी ३५ लाख रुपये मंजूर करून आणल्याच्या थापा मारत काही दलाल पैशांसाठी शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. हा प्रकार थांबवावा, अशी मागणी आष्टी (ता. परतूर) परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या औरंगाबादेतील विभागीय कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
परतूर तालुक्यातील गोदावरी नदीवरील लोणी-गंगासावंगी बंधाऱ्याच्या पाण्यामुळे अनेकांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. त्याचा मोबदला मिळवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करून काही व्यक्ती पैसे घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांना तुमचे बाधित क्षेत्र वाढवून देऊ, माझी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील साहेबापर्यंत लिंक आहे. त्यांना पी.ए.मार्फत पैसे द्यावे लागतात. आम्ही त्यांच्याकडून बाधित क्षेत्रासाठी ३५ लाखांचा निधी पैसे देऊन मंजूर करून आणला आहे. अशा थापा मारीत कामासाठी १० टक्के कमिशन अगोदर द्यावे लागेल, असे सांगत हे दलाल शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करीत आहेत. पाटबंधारे विभागातील देशमुख, मस्के, सोळंके या अधिकाऱ्यांची नावे वापरून दलालांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. संबंधित विभागाने प्रसिद्धिपत्रक काढून शेतकऱ्यांची जनजागृती करावी, दलालांवर कारवाई करावी, अशी मागणी विक्रम तौर, उत्तम पवार, आनंद डवले आदींनी केली आहे.
कॅप्शन : औरंगाबादेत मुख्य अभियंता आव्हाड यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देताना शेतकरी विक्रम तौर, उत्तम पवार, आनंद डवले.