जालना - कारवाईसाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर पिस्तुल रोखून एका कर्मचाऱ्यावर खंजिरने वार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी दुपारी जालना शहरातील एका लॉजवर घडली. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठ्या शिताफीने सहा जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल, एक धारदार खंजीर, कार व एक दुचाकी असा ३ लाख ८८ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जालना शहरातील बसस्थानकाजवळील त्रिवेणी लॉज येथे दोन देशी बनावटीचे पिस्तुल व इतर हत्यार असलेले सहा संशयित व्यक्ती येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. या माहितीनुसार पो.नि. गौर व त्यांच्या पथकाने लॉजवर सापळा रचला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कारमधून (क्र.एम.एच.१२- बी.जी.९२५७) चौघे व एकजण दुचाकीवरून (क्र.एम.एच.२१- बी.जे.५५४८) तर सहावा व्यक्ती दुसऱ्या दुचाकीवरून (क्र.एम.एच.२१- बी.एल.४३५४) आला. त्यातील तिघे लॉजच्या बाहेर थांबले. तर तिघे आतमध्ये गेले. तिघे लॉजमधील एका रूमसमोर आले असता पथकाने कारवाई करीत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकाने ‘इधर मत आओ, हात लगाया तो गोली मार दूंगा’ असे म्हणत पिस्तुल पोलिसांवर रोखली. त्यावेळी पो.नि. गौर यांनी स्वत: जवळील शासकीय सर्व्हिस पिस्तुल काढून त्याच्याविरूद्ध रोखत पोलीस असल्याचे सांगितले. त्याचवेळी एकाने पो.हे.कॉ. कांबळे यांच्यावर खंजिरने वार करण्याचा प्रयत्न केला. कांबळे यांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. इतरांनी लॉजच्या बाहेर पळ काढला. बाहेर थांबलेल्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. तर लॉजबाहेर थांबलेल्या तिघांपैकी दोघे कारमधून व एक जण दुचाकीवरून पळून गेला. पोलिसांनी पाठलाग करून त्या तिघांना ताब्यात घेतले.
पथकाने श्रीकांत ऋषीकुमार ताडेपकर, रवी योसेफ कांबळे, सुशांत उर्फ मुन्ना राजू भुरे, विशाल जगदिश किर्तीशाही, अमरसिंग शिवसिंग सूर्यवंशी-ठाकूर, सुजित शुभ्रमणी श्रीसुंदर (सर्व रा. जालना) या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्तुल, एक खंजिर, कार, दुचाकी असा एकूण ३ लाख ८८ हजार ३१० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि संदीप साबळे, सफौ रज्जाक शेख, पो.हे.कॉ. सॅम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, पो.ना. प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, कृष्णा तंगे, संजय मगरे, रंजीत वैराळे, हिरामन फलटणकर, विनोद गडदे, पो.कॉ सचिन चौधरी, विलास चेके, वैभव खोकले, रवी जाधव, गणेश वाघ, गुन्हे शाखा घटक-९ ठाणे शहर येथील सपोनि संदीप बागुल, पो.उप.नि. दत्तात्रय सरक व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
सहा जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणात पो.उप.नि. संदीप साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील सहा जणांविरूद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील काही आरोपींवर खंडणी, खून, जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत.
एसआरपीएफ मधील जवान
पोलिसांनी पकडलेल्या सहापैकी सुजित शुभ्रमणी श्रीसुंदर हा राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) शिपाई म्हणून कार्यरत आहे. तो राज्य राखीव दल-३ जालना येथे चालक म्हणून कार्यरत आहे. एसआरपीएफ मधील जवानही पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.