पारध/भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे अवैध वाळू वाहतूक करणाºया टिप्पर खाली चिरडून ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत पारध पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.पिंपळगाव रेणुकाई येथील दुर्गादास नरसिंग देशमुख (३७ वर्षे) यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यासाठी त्यांनी धाड (जि.बुलडाणा) येथून वाळूचे टिप्पर बोलावले. हे टिप्पर बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुर्गादास यांच्या घराजवळ आले. परंतु पोलीस व महसूलच्या पथकाच्या कारवाईच्या धाकाने टिप्पर चालकाने घाईतच वाळू उतरवून निघून टिप्पर वळविण्याचा प्रयत्न केला. त्यात टिप्परच्या मागे थांबलेले दुर्गादास देशमुख चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बुलडाणा येथे नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी औरंगाबाद येथे नेण्याचा सल्ला दिला. औरंगाबाद येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सदर टिप्पर अवैध वाळू वाहतूक करीत असून त्यावर नंबरप्लेट नव्हती. चालक, मालक कोण हे सुद्धा कळू शकले नाही.
वाळू वाहतुकीच्या टिप्परने घेतला तरुणाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:57 PM