लोकमत न्यूज नेटवर्कमठपिंपळगाव : अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला मठपिंपळगाव, माली पिंपळगाव येथील युवकांनी वेळेत रुग्णालयात दाखल करून त्याचे प्राण वाचविले. ही घटना मंगळवारी रात्री जालना- अंबड मार्गावरील मठपिंपळगाव शिवारात घडली.मठपिंपळगाव व माली पिंपळगाव येथील काही युवक मंगळवारी रात्री जालना- अंबड मार्गावरून चारचाकी वाहनातून जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला एका दुचाकीचा अपघात झाल्याचे युवकांना दिसून आले. त्यावेळी टिंकू पाटील जिगे, दीपक खेकडे, धीरज जिगे, दीपक भिगारदेव, महेश जिगे, नितीन जिगे, शरद जिगे, प्रभाकर खेकडे, अमर भुतेकर, शाम भुतेकर आदी युवकांनी दुचाकी बाजूला करून जखमी व्यक्तीला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. युवकांनी कोणताही विलंब न लावता जखमीला जालना येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.युवकांनी जखमीची माहिती काढल्यानंतर त्याचे नाव आरिफ काझी (४५ रा. अंबड) असे असल्याचे समोर आले. नंतर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती दिली. नातेवाईक येईपर्यंत हे युवक रूग्णालयात थांबून होते. बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्या युवकाला शुध्द आली आणि त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मठपिंपळगाव येथील या युवकांसोबतच अंबडचे नगरसेवक जाकेर डावरगावकर, शिवसेना शहर प्रमुख कुमार रुपवते, उपशहर प्रमुख दत्ता शिराळे, शाम शेट पवळ, मतीन पटवार, तारेख सय्यद, अविनाश शिंदे यांनीही मोलाची मदत केली.काही महिन्यांपूर्वीच बायपासअपघात झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील आरेफ काझी यांचे काही महिन्यांपूर्वी बायपास आॅपरेशन झाले होते. त्याच बरोबर पोटाचे एक आॅपरेशन झालेले आहे. आरेफ यांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण बचावले.
युवकांमुळे बचावले जखमीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:46 AM