जालना : ऑनलाइन गेमच्या नादात एका युवकाची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना जालना तालुक्यातील ढगी येथे उघडकीस आली आहे. परमेश्वर केंद्रे (३७) असे त्या तरुणाचे नाव आहे. यासाठी त्याला एक एकर शेतीसह १७ लाख रुपयांची कारही विकावा लागली. याबाबत त्याने जालना येथील सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी त्याने मोबाइलमध्ये मॉस्ट बेट हा गेम डाऊनलोड केला होता. सुरुवातीला त्याने १०० ते १००० रुपयांपर्यंत पैसे लावले होते. त्यात तो जिंकत गेला. त्यानंतर २५ ते ३० लाख रुपयांची बेट लावली. त्याच्या खात्यावर पैसे देखील आले. अनेक वेळा त्याने बेट लावली. त्याला पैसे मिळत गेले. त्याने स्वत:कडे असलेली १६ लाख रुपयांची कार विकून गेममध्ये पैसे भरले. गावात असलेली एकर शेतीही त्याने विकली. परंतु, त्यातही तो जिंकला नाही. ऑनलाइन गेमचे हे व्यसन त्याला इतके भारी पडले की, त्याने यापोटी चक्क चाळीस लाख रुपये गमावले आहेत. याबाबत त्याने जालना येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याला बॅंकेचे स्टेटमेंट घेऊन ये, त्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले.