जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन तरुणांनी एका तरुणाच्या गुप्तांगावर चाकूने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चंदनझिरा परिसरातील इंद्रायणी हॉटेलजवळ शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशाल भगवान पगारे (३३, रा. पंचशीलनगर, चंदनझिरा) यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी सकाळी नातेवाइकांनी जालना -छत्रपती संभाजीनगर रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे व डीवायएसपी नीरज राजगुरू यांनी लवकरच आरोपींना अटक करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
चंदनझिरा भागातून शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक चंदनझिरा टी-पाईंटजवळ आल्यानंतर मिरवणुकीत चाकू काढल्याच्या कारणावरून संशयित सूरज गायकवाड व सचिन गायकवाड (दोघे रा. चंदनझिरा) या दोघांनी विशाल भगवान पगारे यांच्या गुप्तांगावर जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार केले. इतरांनी दगडाने मारहाण केली. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाले. मिरवणुकीत सहभागी नागरिकांनी विशाल पगारे यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक निरीक्षक चरणसिंग गुसिंगे, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, पोलिस उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मिरवणूक बंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी रात्री उशिरा संशयित सूरज गायकवाड, सचिन गायकवाड व इतरांवर गुन्हा केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू हे करत आहेत.