जालना/ भोकरदन : खासदार संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या राहुल उत्तम तळेकर याच्या वडिलांची भोकरदन पोलिसांनी शनिवारी चौकशी केली आहे, अशी माहिती भोकरदन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी दिली.
खासदार संजय राऊत यांना एका तरुणाने मॅसेजद्वारे जिवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी सदर नंबर ट्रेस करून पुणे पोलिसांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पुणे पोलिसांनी चंदननगर येथील टाटा गार्डनजवळून राहुल तळेकर या हॉटेल चालकाला ताब्यात घेतले. तो जालना जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांना समजले. पुणे पोलिसांनी रात्री उशिराला त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. नंतर जालना पोलिसांना त्याच्या आई-वडिलांची चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार भोकरदनचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी राहुल तळेकरच्या वडिलांना बोलावून चौकशी केली. राहुल काय करत होता, तो पुण्याला कसा केला आदी बाबींची विचारपूस करण्यात आल्याची माहिती जोगदंड यांनी दिली.
पुण्यात चालवायचा हॉटेलराहुल तळेकरचे आई-वडील भोकरदन येथे शेती करतात. त्याचा लहान भाऊ हा पुण्यातील एका कंपनीत नोकरी करतो. तर राहुल हा पुण्यातील एका हॉटेलमध्ये काम करीत होता. काम करत असतानाच त्याने चंदननगर येथील टाटा गार्डनजवळ हाॅटेल टाकली. परंतु, खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याने त्याला पुणे पोलिसांनी शुक्रवारी रात्री ताब्यात घेतल्याची माहिती पुणे क्राइम बॅचचे सहायक आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.
काय आहे प्रकरण?"तू दिल्लीमध्ये भेट तुला एके ४७ ने उडवतो, तुझा मूसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स," अशा आशयाची ही धमकी संजय राऊत यांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देण्यात आली होती. त्यानंतर यासंदर्भातील माहिती पोलिसांना देण्यात आली.