वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षणासाठी एका तरूणाने पेटवून घेतल्याची घटना अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रूक येथे २२ नोव्हेंबर रोजी घडली होती. सूरज गणेश जाधव (२१) असे त्या तरूणाचे नाव आहे. परंतु, उपचार सुरू असतांना, त्याचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला.
अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील सूरज जाधव हा अंकुशनगर येथेच आयटीआयचे शिक्षण घेत होता. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही, त्यामुळे मी आता आत्महत्या करतो, असे आईला म्हणत त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. त्यानंतर स्वत:च्या हाताने पेटवून घेतले. त्याला वाचविण्यासाठी आई मंगलबाई जाधव आणि वडील गणेश जाधव हे धावले. परंतु, त्यात ते दोघेही जखमी झाले. नंतर ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझविली. त्यांना तातडीने जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे तिघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
दरम्यान, सूरज हा ५५ ते ६० टक्के, आई मंगलबाई ३० ते ३५ टक्के भाजली होती. तर वडील १० टक्के भाजल्याचे सांगण्यात आले होते. सुरज याच्यावर २२ नोव्हेंबरपासून घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी पहाटे पाच वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पाथरवाला बुद्रुक येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास आणण्यात आला. त्याच्या पश्चात आई- वडील, एक लहान भाऊ आहे. त्याची आई जखमी असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय उपचार सुरु आहे. सूरज वर गावातच शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.