लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा परिषदेच्या निवडणुका २०१७ मध्ये पार पडल्या होत्या. त्यावेळी अध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गातील पुरूषांसाठी सुटले होते. त्यानुसार शिवसेनेचे अनिरूध्द खोतकर हे अध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश टोपे हे उपाध्यक्ष झाले होते. त्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपून चार महिने जास्त झाले आहेत. परंतु निवडणुकांमुळे हे चार महिने अध्यक्ष, उपाध्यक्षांना जास्तीचे मिळाले. मंगळवारी जाहीर झालेल्या आरक्षणातजालना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीतील सर्वसाधारण गटासाठी सुटले आहे. त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे असे मिळून आठजण या अनुसुचित प्रवर्गातील आहेत.जालना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे लढले होते. त्यामुळे भाजपचे २२ , शिवसेना १४, काँग्रेस ५, राष्ट्रवादी १३ आणि अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल सध्या आहे. यात निवडणुकीनंतर भाजपने आपले जास्त सदस्य असल्याने शिवसेनेने आपल्याला पाठिंबा देऊन अध्यक्षपद भाजपला द्यावे असा प्रस्ताव शिवसेनेकडे ठेवला होता. परंतु हा प्रस्ताव शिवसेनेने धुडकावून देत, राष्ट्रवादीशी हातमिळावणी करून अध्यक्षपद हे तत्कालीन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या चुलत भावाकडे म्हणजेच अनिरूध्द खोतकरांकउे आले. त्यातच राष्ट्रवादीच्या सतीश टोपे यांना अचानक लॉटरी लागून उपाध्यक्षपद मिळाले आहे. हे दोन्ही पदाधिकारी यापूर्वीही याच पदावर अनेकदा राहिल्याने त्यांना जिल्हा परिषद चालविण्याचा दांडगा अनुभव आहे.आज आरक्षण जाहीर झाल्यावर जालना जिल्हा परिषदेतील राजकीय समीकरणे बदलतात काय, या बद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. मध्यंतरी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात बिनसले होते. परंतु हा वाद आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे सत्तेचे पारडे कुठे झुकते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.अशात राज्यातील शिवसेना आणि भाजपमधून सध्या विस्तवही जात नसल्याने जालना जिल्हा परिषदेतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाशिव आघाडी कायम राहील याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.जालना जिल्हा परिषदेत एकूण ५५ जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यातील आठ सदस्य हे अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत.त्यात उत्तम वानखेडे- शिवसेना, मधुकर खंदारे, रेणुका हनवते आणि वैजयंती प्रधान भाजप, सोपान पाडमुख, नितू पटेकर राष्ट्रवादी तर काँग्रेसकडून दत्ता बनसोडे आणि अरूणा शिंदे यांचा समावेश आहे. यामुळे आता या आठ जणांमधूनच जिल्हा परिषदेचा आगामी अध्यक्ष होणार, हे निश्चित मानले जात आहे.
चार महिन्यापूर्वी कार्यकाळ संपलेल्या ‘झेडपीत’ ८ जण अध्यक्षपदाच्या शर्यतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:40 AM