लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या खेळाडूंसाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा प्रबोधनी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हाभरातील ८० खेळाडूंचे पालकत्व जिल्हा परिषद प्रशासन स्वीकारणार आहे.आजकाल केवळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर दिला जातो. गुणवंत, गुणात्मक विद्यार्थी घडविण्यासाठी संस्थेसह पालक सुध्दा आग्रही असतात. मात्र विद्यार्थ्यांना काय आवडते, याकडे कोणाचेही लक्ष नसते. विशेष करून ग्रामीण भागामध्ये भौगोलिक परिस्थितीमध्ये खेळल्या जाणा-या खेळातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रीडागुणांना कुठेही वाव मिळत नाही. अशा खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर वाव मिळावी, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने ८० खेळाडंूंचे पालकत्व स्वीकारण्यात येणार आहे.जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला. यामध्ये जालना जिल्ह्यातील उत्कृष्ट ८० विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना निवासी मार्गदर्शन केंद्र मल्टीपर्पज हायस्कूल येथील इमारतीमध्ये ठेवण्यात येणार आहे. येथे सर्व खेळांडूची राहण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या खेळाडूंकडून दररोज सरावही करून घेण्यात येणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले.दरम्यान, हा उपक्रम सीईओ निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून पुढे आला आहे. यासाठी जिल्हाभरातील सर्व शिक्षक संघटना मदत करणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारावी, यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. आम्ही सीईओ अरोरा यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करतो. आणि शिक्षकांकडून जमेल ती मदत देणार असल्याचे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष राजगुरू, बहुजन कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी महासंघाचे संजय हेरकर, मंगेश जैवाळ, अरविंद तिरपुडे, सचिन दोरके, सानप, ज्योतीसिंग छानवाल, गिरीधर राजपूत, अमोल तोडे, दत्ता वाघमारे, शिवाजी आडसूळ, गणेश लादे, रघुनाथ वाघमारे, शरद कुलते, विजय चेके, अनिता चव्हाण, रूपाली नामेवार, सपना क्षीरसागर आदींनी सांगितले.सीईओंच करणारखेळाडूंची निवडग्रामीण भागातील खेळाडूंनी येणा-या काळात राज्य व राष्ट्रीयस्तरावर नेतृत्व करावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या खेळाडूंची निवड स्वत: हा मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा करणार आहेत. यात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे.यासाठी जिल्हा परिषदेकडून मिळणारा श्रेष्ठ फंड अपुरा पडत आहे. या अपुºया निधीतून तोडगा काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना व पदाधिकाºयांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिक्षकांना निधी देण्याचे आवाहन केले. आवाहन करताच शिक्षक संघटनांनीही वर्षाला आपल्या पगारातून दोनशे रुपये देण्याचे मान्य केले आहे.
जालना जिल्हा परिषद स्वीकारणार ८० खेळाडूंचे पालकत्व...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:53 AM