लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : जिल्हा परिषदेच्या शाळेतून आता शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी सोलार कुकरचा वापर केला जाणार आहे. जाफराबाद तालुक्यातील काळेगाव व डावरगाव देवी या दोन शाळांची या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी निवड झाली असून नुकतेच या दोन्ही शाळांवर सोलार कुकर सेट बसविण्यात आले आहेत.शालेय पोषण आहार योजनेंतर्गत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना खिचडी, वरण- भात, आमटी असा आहार देण्यात येतो. शालेय पोषण आहारासाठी इंधनाची तरतूद करण्यात येते. मात्र, सोलार कुकरमुळे आता भाता सोबतच वरण इंधनाशिवाय शिजणार आहे. यासोबत १० लिटरचे प्रेशर कुकर पुरविण्यात आले आहेत. चोहोबाजूंनी पारा बसविलेल्या या संचात सूर्याची सर्व किरणे मध्यभागी केंद्रित करण्यात आली आहे. याठिकाणी कुकर ठेवण्यासाठी जागा ठेवण्यात आली असून, अवघ्या अर्ध्या ते एका तासात या कुकरमध्ये वरण शिजणार आहे. यामुळे वेळ आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे. विशेष म्हणजे या सोलार संचासोबत स्वयंपाकीसाठी पारयापासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून काळा गॉगल हँड ग्लोव्हज, टोपी इ. साहित्याची कीट पुरविण्यात आली आहे. उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूत हे सोलार कुकर उपयोगी पडणार असले तरी पावसाळ्यात यावर मर्यादा येऊ शकतात.एकूणच या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. परंतु हा प्रयोग कितपत यशस्वी ठरतो हे पाहणे लक्षणीय ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
सोलार कुकरमधून शिजणार जि.प. शाळेत खिचडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:32 AM