जालना : जि. प. त कुठलेही काम फुकट होत नाही, पैसे दिले नाही तर बिल मिळणार नाही, असे सांगून वीस हजारांची लाच स्वीकारणा-या जि. प. आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायकास मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. रानबा श्रीपतराव भाग्यवंत (५३, रा. जि.प. क्वार्टर, जालना) असे लाच स्वीकारणा-या सहायकाचे नाव आहे.या प्रकरणातील तक्रारदाराची आई आरोग्यसेविका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. सेवाकाळातील जमा रजारोखी करण्याचे बिल न मिळाल्याने तक्रारदार जि. प.तील आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक रानबा भाग्यवंतला भेटले. भाग्यवंत याने तक्रारदारास ४० हजारांची लाच मागितली. ‘जिल्हा परिषदेत कुठलेही काम फुकट होत नाही. पैसे दिले तरच तुमचे बिल तयार करून राणी उंचेगावला पाठवितो, अन्यथा काम होणार नाही’, असे सांगितले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी तक्रार केली. विभागाने पडताळणी केली असता, भाग्यवंतने ३० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत विभागाने मंगळवारी दुपारी जि. प. आरोग्य विभागात सापळा लावला. मात्र, भाग्यवंत जि. प. इमारतीसमोरील मुख्य रस्त्यावरील एका चहाटपरीवर जाऊन थांबला. लाचलुचपत विभागाने या ठिकाणी सापळा लावून भाग्यवंतला तक्रारदाराकडून तीस हजारांपैकी वीस हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. लाचलचुपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशिद, कर्मचारी संतोष धायडे, प्रदीप दौंडे, संजय उदगीरकर, अमोल आगलावे, नंदू शेंडीवाले, संदीप लव्हारे, रमेश चव्हाण, म्हस्के, खंदारे यांनी ही कारवाई केली.
जि. प.त कुठलेही काम फुकट होत नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:30 AM