- विजय मुंडेजालना : जिथं ३० पर्यंत पाढे पाठ करताना अनेकांच्या नाकी नऊ येतात तिथं लालवाडी तांडा (ता. अंबड) येथील विद्यार्थ्यांना चक्क १५१ पर्यंतचे पाढे मुखपाठ आहेत. यात ५० च्या पुढे पाढे पाठ असणारे सहा विद्यार्थी आहेत. शाळेच्या आवारातही पाढ्यांचीच झाडे असून, जिल्ह्यातील अनेक शिक्षणप्रेमी आवर्जून या शाळेला भेटी देऊन मुलांचे पाढे ऐकण्यासह तेथील उपक्रमांची माहिती जाणून घेत आहेत.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असला तरी पालक, ग्रामस्थांच्या सहकार्यातून आज जिल्हा परिषद शाळांनी कात टाकली असून, गुणवत्ताही वाढत आहे. अशाच उपक्रमशील शाळांमध्ये लालवाडी तांडा (ता. अंबड) शाळेची ओळख आहे. पहिली ते चौथीपर्यंत असलेल्या या शाळेत २८ मुलं ज्ञानार्जन करतात. येथील उपक्रमशील शिक्षक सचिन रामदास खिल्लारे यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाढ्यांचे झाड हा उपक्रम राबविला. या उपक्रमात सहभागी झालेल्या सहा विद्यार्थ्यांना ५० च्या पुढचे पाढे पाठ आहेत. दोन विद्यार्थी ९० ते १५१ पर्यंतचे पाढे म्हणतात. सचिन खिल्लारे यांच्या या उपक्रमाची सर फाउंडेशनकडून आयोजित नॅशनल टीचर इनोव्हेशर अवॉर्डसाठी निवड झाली आहे. शिवाय एससीईआरटी उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत जिल्हास्तरावर ही शाळा अव्वल ठरली आहे.
१५ विद्यार्थ्यांनी मिळविले पाढ्यांचे झाडशिक्षक सचिन खिल्लारे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या पाढ्यांचे झाड या उपक्रमात १५ मुलांनी बाजी मारली. यात आर्यन राठोड, युवराज मुळे, यश राठोड, पूजा राठोड, पिहू राठोड, रणवीर राठोड, राजवीर राठोड, अंकिता राठोड, अक्षरा चव्हाण, विरेन राठोड, रूद्र राठोड, रोहन चव्हाण, प्रियंका राठोड, अनिकेत राठोड या मुलांचा समावेश असून, त्यांना पाढ्यांचे झाड पारितोषिक म्हणून देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादगणित आणि इंग्रजी विषय मुलांना अवघड वाटतात. परंतु, हेच अवघड विषय अधिकाधिक सोपे करण्यासाठी विविध उपक्रम शाळेत राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाढ्यांचे झाड हा उपक्रम राबविण्यात आला असून, याला शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.- सचिन खिल्लारे, उपक्रमशील शिक्षक