आर.एस. पाटील फत्तेपूर, जि. जळगाव : नवीन वीज मीटर बसविण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना वीज वितरण कंपनीतील सिनियर टेक्निशियन व त्याच्या खासगी पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही घटना बुधवारी दुपारी फत्तेपूर ता. जामनेर येथे घडली.
सिनियर टेक्निशियन विनोद उत्तम पवार (३२, रा.फत्तेपूर, ता.जामनेर) आणि त्याचा खासगी पंटर कलिम सलीम तडवी (२७, रा. रा.देऊळगाव, ता.जामनेर) यांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. तक्रारदार यांना तोरनाळे ता.जामनेर या त्यांच्या मुळगावी वडीलांच्या नावे असलेल्या बखळ जागी पत्र्यांच्या शेडमध्ये विज मीटरचे नविन कनेक्शन घ्यायचे होते. यासाठी त्यांनी अर्ज केला होता.
डिमांड नोट भरण्यासाठी वरील दोघांनी ३५०० रुपयांची मागणी केली. यावर तक्रारदाराने दोन हजाराची रक्कमही दिली. वीज मीटरचे नवीन कनेक्शन जोडणीसाठी १५०० रुपये मागितले. ही रक्कम घेताना दोघांना बुधवारी दुपारी फत्तेपूर येथे रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.