एरंडोल : येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगतच्या महाजन नगरात सोनू भालेश्वर डिंगे यांच्याकडे २६ जून, २०२१ रोजी भल्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून १ लाख रुपये रोकडसह १७ हजारांचा ऐवज लंपास केला.
शहराच्या बाहेरच्या भागातील नवीन वसाहतीत ही धाडसी चोरी झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल येथील सोनू भालेश्वर डिंगे हा सफाई कामगार महाजन नगरात वास्तव्यास असून, परिवारातील सर्व जण हॉलमध्ये दरवाजा उघडा ठेवून, लोखंडी ग्रीलच्या दरवाजाची कडी लावून झोपले होते. भल्या पहाटे डिंगे हे लघुशंकेसाठी उठले असता, त्यांना लोखंडी ग्रीलचा दरवाजा उघडा दिसला व कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
पुढील खोलीमधील लोखंडी कपाटाचे दार उघडे आढळून आले, त्यातील सामानही इतस्तत: फेकण्यात आला होता. घर बांधण्यासाठी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली १ लाख रुपयांची रोकड, ५ हजार रुपये किमतीचा मोबाइल, १२ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेन्डन्ट अज्ञात चोरट्यांनी घरातून चोरून नेले.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल पंकज पाटील, संदीप पाटील, राजेश पाटील, अनिल पाटील हे करीत आहेत.