जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी बुधवारी एक दिवसाची सामुहिक रजा टाकुन कार्यालयांसमोर धरणे आंदोलन व निदर्शने करीत घोषणाबाजी केली. त्यात ५१५ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महसूल मंत्री, महसूल विभागाचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव (सेवा), अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्याशी झालेल्या चर्चेत महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेच्या काही मागण्या तत्वत: मान्य केलेल्या आहेत. परंतु मान्य केलेल्या मागण्यांना ६ वर्षांचा कालावधी होवूनही त्याबाबत शासनाकडून अद्यापपावेतो कोणताही शासननिर्णय निर्गमीत झालेला नाही. त्यामुळे शासनाने याबाबत त्वरीत कार्यवाही न केल्यास संघटनेच्या आंदोलनाची रुपरेषा निश्चीत करण्यात आलेली आहे आणि याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे बुधवार, २८ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाºयांनी सामुहिक रजा आंदोलन केले.यासाठी जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी यांनी काल रोजी सामुहिक रजेचा अर्ज स्वाक्षरी करुन निवेदनासह जिल्हाधिकारी यांना दिला. आंदोलनाच्या ठरलेल्या टप्प्यानुसार बुधवारी सर्व कर्मचारी सामुहिक रजेवर होते.सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत घोषणा देण्यात आल्या.या प्रसंगी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे दिनकर मराठे, सुयोग कुलकर्णी, अजय कुलकर्णी, देवीदास अडकमोल, अमित दुसाने तसेच महिला प्रतिनिधी- नम्रता नेवे, मंदाकिनी सुर्यवंशी, शिल्पा सागर, मनोरे तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालये व उपविभागीय अधिकारी कार्यालये येथे उपविभागीय अध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सर्व महसूल कर्मचाºयांनी सहभाग नोंदवला.
सामूहिक रजा व धरणे आंदोलनात ५१५ महसूल कर्मचारी सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:55 PM