जळगाव- मुंबईतील सोलर मॅन प्रा. चेतनसिंह सोलंकी यांच्या गांधी ग्लोबल सोलर यात्रातंर्गत बुधवारी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सव व गांधी जयंतीच्यानिमित्ताने मू.जे. महाविद्यालयातील तब्बल १०० विद्यार्थी एकाचवेळी सौरदिवे साकारणार असून यामूळे महाविद्यालय प्रकाशमय होणार आहे.गांधी जयंतीनिमित्त देशभरात सव्वा लाख सौरदिवे बनवण्याचा विक्रम आयआयटी मुंबईतील प्राध्यापक चेतनसिंग सोलंकी यांनी मागच्या वर्षी आपल्या नावावर नोंदविला होता. यंदा ते गांधी जयंतीनिमित्त जगभरात एकाचवेळी लाखो विद्यार्थ्यांना सौरदिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचा अनोखा विक्रम करणार आहेत. त्यातंर्गत मू.जे. महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे गांधी ग्लोबल सोलर यात्रा कार्यक्रमाचे आयोजन २ आॅक्टोंबर रोजी सकाळी १०़३० वाजता केले आहे.प्राध्यापक देणार प्रशिक्षणमू़जे़ महाविद्यालयातील फिजीक्स विभागातील १०० विद्यार्थी गांधी जयंतीला सौरदिवे साकारणार आहेत. त्यासाठी प्रा. डॉ़ मृणाल महाजन व प्रा. डॉ. प्रतिभा निकम हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. विशेष, म्हणजे मुंबई आयआयटीकडून सौरदिवे बनविण्यासाठी सुटे भाग महाविद्यालयास पुरविण्यात आलेले आहे. त्यामध्ये एलईडी लाईट, सोलर पॅनल, सर्कीट यासह विविध सुटे भाग किट स्वरूपात देण्यात आले आहे. विद्यार्थी स्वत: सौर दिवा तयार करून घरी घेऊन जाणार आहे. यादिवशी वातावरणातील बदल तसेच सौर उर्जबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाईल.काय आहे उद्देशआजही देशातील अनेक घरे विजेविना आहेत. तर अनेक घरात पुरेसा प्रकाश नाही. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे. अशा विद्यार्थ्यांना वीज उपलब्ध करून देण्यासाठी आयआयटी मुंबईने सौरदिवे तयार करून ते सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्यात आयआयटी मुंबईचे प्रा़ चेतनसिंह सोलंकी यांनी सौरउर्जेचा वापर करून गावागावांमध्ये वीज उपलब्ध करून दिली आहे़ तसेच सौरदिवे बनविण्याचे प्रशिक्षण देऊन महिलांना सुध्दा रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत: सौरदिवे साकारून रोजगार उपलब्ध व्हावा व ग्रामीण भागातील अंधारमय जीवन प्रकाशमान व्हावे, हे या यात्रेचे उद्देश आहे.