लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : उच्चशिक्षण विभागातर्फे विविध पदवीच्या विद्यार्थ्यांना विविध योजनांच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. या वर्षी शिष्यवृत्तींसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून ५ हजार १२१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी १ हजार ७५२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली असून, लवकरच त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. दुसरीकडे अजूनही १ हजार ९८ अर्ज महाविद्यालयाच्या लॉगिनला पडून असल्याची माहिती उच्चशिक्षण विभागाकडून मिळाली.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षण विभागातर्फे विविध तेरा शिष्यवृत्ती दिल्या जात असतात. मागील वर्षी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या विविध शिष्यवृत्तीसाठी जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. तिन्ही जिल्ह्यातून जळगाव उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाला ५ हजार १२१ ऑनलाइन अर्ज प्राप्त झालेले आहेत.
छाननीसाठी १ हजार ९८ अर्ज पडून
एकूण अर्जांपैकी छाननीसाठी १ हजार ९८ अर्ज महाविद्यालयांच्या लॉगिनला पडून आहेत. दरम्यान, त्यापूर्वी ३ हजार २८२ अर्जांना मान्यता देऊन ते अर्ज उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या लॉगिनला पाठविण्यात आले होते. उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून त्या अर्जांपैकी ३ हजार १९४ अर्जांना मान्यता दिली आहे. त्यांना शासनाकडे मंजुरीला पाठविले असून, त्यातील १ हजार ७५२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. सध्या उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या लॉगिनला ८८ अर्ज छाननीसाठी पेंडिंग आहेत.
शिष्यवृत्तीचे ८९ लाख ९० हजार होणार खात्यावर जमा
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर रिडिम करून रीड करणे आवश्यक आहे, तरच विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती ही जमा होत असते. लवकरच १ हजार ७५२ विद्यार्थ्यांच्या खात्यावर एकूण ८९ लाखा ९० हजार ८५० रुपयांची शिष्यवृत्ती जमा होणार आहे.