सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: एस.टी.महामंडळाच्या ताफ्यात शुक्रवारी नवीन १० बसेस दाखल झाल्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यासाठी नवीन १४१ इलेक्ट्रीक बसेस ही शासनाने मंजूर केलेल्या आहेत. त्या देखील लवकरच सेवेत दाखल होतील. ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’ यशस्वीपणे राबवून जळगाव विभाग राज्यात अव्वलस्थानी येण्यासाठी सांघिक प्रयत्न करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
सागर पार्क मैदानावर शुक्रवारी हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आमदार चिमणराव पाटील, विभाग नियंत्रक बी.सी.जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, कामगार अधिकारी कमलेश भावसार, उपअभियंता अजय पाटील, अर्चना भदाणे, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, विजय पाटील, एस. टी. कामगार सेनेचे आर. के.पाटील, राहुल पाटील, एस टी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलतीचा निर्णय हा यशस्वी झाला आहे. उन्हाळी गर्दी हंगामात जळगाव विभाग उत्पन्नवाढीत १० दिवसात तब्बल १० कोटी उत्पन्न मिळवून राज्यात प्रथम आला आहे. विभाग नियंत्रक जगनोर यांनी साध्या नवीन १०० व १४१ इलेक्ट्रीक बसेचा मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला होता. त्यानुसार पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने १० नवीन साध्या बसेस प्राप्त झाल्या. १४१ इलेक्ट्रीक बसेसही मंजूर झालेल्या आहेत. त्यात पाचोऱ्यासाठी २१, मुक्ताईनगर १७, चोपडा २१ व इतर भागासठी ६२ बसेस वितरीत केल्या जाणार आहेत. या बसेस लवकरच टप्याटप्याने दाखल होणार आहेत. जळगाव, पाचोरा, चोपडा व मुक्ताईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे.
रोज एक लाख महिलांचा प्रवास
शासनाने ४० टक्के महिलांना बस भाड्यात सवलत दिल्याने जळगाव जिल्ह्यात दररोज तब्बल १ लाख महिला प्रवास करीत आहेत. एकूण प्रवासा संख्येपैकीय पैकी ४० टक्के प्रवासी या महिला आहेत. १ ते १० मे पर्यंत या १० दिवसाच्या कालावधीत महामंडळाने १० कोटी रुपये उत्पन्न मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महामंडळ वाचविण्यासाठी महिलांची प्रवास वारी कामी येत असल्याचे दिसून येत आहे. प्रास्ताविक बी सी जगनोर यांनी तर सूत्रसंचालन कामगार अधिकारी कमलेश भावसार यांनी केले. संदीप पाटील यांनी आभार मानले.