पोस्ट कोविड : अनेकांना श्वसनाचा त्रास, जीएमसीत आहेत दाखल
आनंद सुरवाडे
जळगाव : कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेकांना पोस्ट कोविडच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केवळ गंभीर रुग्णांना दाखल करण्यात येते. मात्र, तरीही या ठिकाणी दाखल दहा रुग्णांनी कोरोनावर मात केली असली तरी साधारण महिना- दीड महिन्यापासून या रुग्णांवर जीएमसीत उपचार सुरू आहेत. त्यांची ऑक्सिजन पातळी सामान्य होत नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कोविडनंतर पहिल्या लाटेतही पोस्ट कोविडची अनेक प्रकरणे समोर आली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत हे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा अधिक समोर आहे. त्यातच दुसऱ्या लाटेत कमी कालावधीत अधिक रुग्ण समोर आले होते. त्यामुळे यंदा नॉन कोविड यंत्रणा सुरू झाल्यानंतर पोस्ट कोविडचे अधिक रुग्ण समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सद्य:स्थितीत केवळ दोन कक्ष सुरू आहेत. यात ९ क्रमांकाच्या कक्षात कोविड तर ७ व्या कक्षात संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. यासह अतिदक्षता विभागात रुग्ण दाखल आहेत. सद्य:स्थितीत या ठिकाणी २६ रुग्ण हे कोविडचे, तर १६ रुग्ण हे म्युकरमायकोसिसचे उपचार घेत आहेत.
कोरोनाचे एकूण रुग्ण : १४२४८०
बरे झालेले रुग्ण : १३९७१७
एकूण बळी : २५७४
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : १८९
अन्य व्याधी असलेल्यांना धोका
कोरोनानंतर पोस्ट कोविडचा अन्य व्याधी असलेल्यांना अधिक धोका व त्रास होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी जीएमसीत पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली होती. यात अशक्तपणा, दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, अशी लक्षणे घेऊन हे रुग्ण येत होते.
ही घ्या काळजी
- कोरानातून बरे झाल्यानंतर लगेच मेहनतीची कामे टाळावीत, सुरुवातीचे किमान पंधरा दिवस ते एक महिना आराम करून नंतरच हळूहळू कामांना सुरुवात करावी.
- नियमित पौष्टिक आहार घ्यावा, यात प्रोटीनयुक्त पदार्थांचे अधिक सेवन करावे.
- श्वसनाचे व्यायाम करावे. यामुळे तुमच्या फुप्फुसांची कार्यक्षता चांगली राहते.
- काही त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.
कोरानातून बरे; पण श्वसनाचा त्रास
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या लाटेत दाखल एकूण रुग्णांपैकी किमान १५ टक्के रुग्णांना लंग्स फायब्रोसिसचा त्रास आहे. यात अनेकांना तर पोस्ट कोविडचे गंभीर परिणाम असून त्यांना फुप्फुस प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. रुग्ण बरा होऊनदेखील त्यांची ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित राहत नसल्याने त्यांना रुग्णालयात अधिक काळ ठेवावे लागत आहे. दाखल रुग्णांना नियमित ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो.
कोट
कोराेनातून बरे झाल्यानंतर मेहनीची कामे टाळावी, पौष्टिक आहार घ्यावा, श्वसनाचे व्यायाम करावे. नॉन कोविड यंत्रणा सुरू झाल्यानंतर पोस्ट कोविडचा त्रास घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढू शकते. दुसऱ्या लाटेत अनेकांना लंग्स फायब्रोबिसचा त्रास झाला आहे. अनेकांना अशक्तपणा, दम लागणे, असा त्रास जाणवू शकतो.
- डॉ. भाऊराव नाखले, प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग