लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून शहरातील दुकानदारांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी देखील मनपाच्या पथकाने जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या दहा दुकानदारांवर कारवाई केली आहे. मुख्य बाजारपेठ भागातील १० दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने सील केली आहेत. तसेच प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून आता शहरातील मुख्य बाजारपेठ भागासह उपनगरांमध्ये देखील पाहणी करून नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात कडक मोहीम उघडली आहे. मंगळवारी देखील कोंबडी बाजार भागातील तीन दुकाने सील करण्यात आली. तर बळीराम पेठ भागातील सात दुकाने महापालिकेच्या पथकाकडून करण्यात आली आहेत.
मुख्य बाजारपेठ भागातील भाजीपाला विक्रेते अखेर झाले गायब
गेल्या दोन दिवसांपासून मुख्य बाजारपेठ भागातील भाजीपाला विक्रेत्यांनी आता हळूहळू महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक या भागात नागरिकांव्यतिरिक्त विक्रेत्यांच्या शुकशुकाट पाहायला मिळाला. तसेच शिवतीर्थ मैदानावर भाजीपाला यांची संख्या गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मंगळवारी वाढलेली दिसून आली. यासह ख्वाॅजामिया चौकात देखील महापालिकेने निश्चित केलेल्या जागेवर मंगळवारी अनेक विक्रेत्यांनी दुकाने सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळाले. महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून व्यवसाय केल्यास महापालिका अशा विक्रेत्यांना देखील सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र नियमांची पायमल्ली करणाऱ्या विरोधात तीव्र कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.