आज पुन्हा होऊ शकते मनपा प्रशासनाची झाडाझडती :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विधिमंडळातील ३० आमदारांची अंदाज समिती मंगळवारपासून जिल्हा दौऱ्यावर असून, मंगळवारी काही विभागांचा आढावा या समिती सदस्यांनी घेतला होता. तर बुधवारी समिती सदस्यांनी जिल्ह्यातील काही प्रकल्पांच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. दरम्यान, गुरुवारी पुन्हा या समिती सदस्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेण्यात येणार असून, महापालिकेच्या २५ व १०० कोटी रुपयांचा निधीवरूनदेखील अंदाज समितीकडून मनपा प्रशासनाची झाडाझडती होण्याची शक्यता आहे.
अंदाज समितीने मंगळवारी घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान भुयारी गटार योजना, घनकचरा प्रकल्प, पाणीपुरवठा योजना व शहरातील २० किमीच्या रस्त्यांच्या प्रश्नावरून मनपा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. आता गुरुवारी पुन्हा या समिती सदस्यांकडून विविध विभागांमध्ये शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा विनीयोग कसा करण्यात आला? या विषयावर आढावा घेण्यात येणार आहे. महापालिकेला गेल्या पाच वर्षांत २५ कोटींचा निधी खर्च करता आलेला नाही, तर १०० कोटींचेही नियोजन तीन वर्षांत करता आलेले नाही. त्यामुळे या निधी खर्चावरून अंदाज समितीच्या सदस्यांकडून पुन्हा एकदा मनपा प्रशासनाला टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या ढिसाळपणामुळे शासनाकडून निधी प्राप्त होत असताना त्या निधीचे योग्य नियोजन करता आलेले नाही. २०१६ मध्ये महापालिकेला तत्कालीन राज्य शासनाकडून २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र, तब्बल ५ वर्षांतही हा निधी मनपाला खर्च करता आला नाही. अजूनही या निधीतील ४ कोटी रुपयांचा निधी खर्च होणे शिल्लक आहे. तर २०१८ मध्ये महापालिकेला प्राप्त १०० कोटी रुपयांच्या निधीतून मनपा व सत्ताधाऱ्यांना नियोजनच करता आले नसल्याने तीन वर्षांनंतरही या निधीतून एक रुपयाचाही खर्च मनपाला करता आलेला नाही.
इतर विभागांचाही घेतला जाईल आढावा
अंदाज समितीच्या दौऱ्याचा गुरुवारी शेवटचा दिवस असून, मंगळवारी ज्या विभागांचा आढावा घेण्याचे राहिले होते त्या विभागांचा आढावा गुरुवारी घेतला जाणार आहे. जिल्हा परिषद, गृह विभागासह मनपा, आरोग्य, महसूल या विभागांचा आढावा गुरुवारी घेतला जाणार आहे. तसेच समिती सदस्य गुरुवारी काही ठिकाणी सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीदेखील करण्याची शक्यता आहे.