- डमी : स्टार - ८१९
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शहरातील शाळांमधील नव्या शैक्षणिक वर्गाचा श्रीगणेशा ऑनलाईन झाला. दरवर्षीप्रमाणेच १५ जून रोजी शाळा भरल्या, पण त्या शाळेत नव्हे तर घराघरात. दुसरीकडे मात्र मुख्याध्यापक, शिक्षकांना शाळांमध्ये हजेरी लावावी लागत आहे. नुकतेच शिक्षण विभागाने परिपत्रक काढले असून त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात प्रत्यक्ष शाळा भरविणे शक्य नसल्याने अनेक शाळांनी ऑनलाईन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत पालकांना आगाऊ सूचना देण्यात आल्या होत्या. पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पालकांनीही लॅपटॉप, डेस्कटॉप अथवा मोबाइल, हेडफोन, प्रिंटर आदी जमा करून ठेवले होते. शाळेच्या नेहमीच्या वेळी विद्यार्थी शाळेच्या गणवेशात लॅपटॉपसमोर बसले आणि हजेरीची नोंद होऊन नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा झाला. शाळेची वेळ होण्यापूर्वी नेट कनेक्शनची तपासणी, लॅपटॉपचे चार्जिंग, स्पीकर-हेडफोन, वही, पुस्तक, पेन आदी तयारी करण्यात आली होती. काही अॅप्लिकेशनवर अन्य विद्यार्थ्यांचे चेहरेही दिसत असल्याने अनेकांनी सुटीनंतर पहिल्यांदाच आपल्या मित्र-मैत्रिणींना हाय-हॅलो केले. काही तांत्रिक अडचणी वगळता विद्यार्थी आणि शिक्षकांनीही शिक्षणाच्या या नव्या स्वरूपाचा आनंद घेतला आणि ऑनलाईन शाळा भरल्या.
शंभर टक्के उपस्थितीत यांचा समावेश
इयत्ता दहावी व बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून मर्यादित वेळेत तो निकाल घोषित करावयाचा आहे. त्यामुळे इयत्ता दहावी व बारावीच्या शिक्षकांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. सोबत शिक्षकेतर कर्मचारी यांचीसुध्दा शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य केली गेली आहे.
शिक्षकांमध्ये उडाला गोंधळ
इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आली आहे. मध्यंतरी शिक्षकांच्या उपस्थितीबाबत दोन पत्रके काढण्यात आली होती. परिणामी, यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळ उडाला होता. जिल्हा परिषदेने शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य केली होती तर शिक्षण संचालकांच्या पत्रकात ५० टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचे म्हटले होते. मात्र, आता संचालकांच्या पत्राच्या आधारावर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने उपस्थितीबाबत परिपत्रक काढले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही ऑनलाईन वर्ग भरले. कुठल्याही विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणात व्यत्यय येणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांना नियमित व्हॉट्सअॅप ग्रुपवर अभ्यास पाठविण्यात येत असून तो करून घेतला जात आहे.
- मनोज भालेराव, शिक्षक
अशा आहेत शाळा
जिल्हा परिषद : १८२८
शासकीय शाळा : ३१
मनपा शाळा : ३०
नगरपालिका शाळा : ४३
खासगी अनुदानित शाळा : ९६२
खासगी विनाअनुदानित शाळा : १५६
स्वयंअर्थसहायित शाळा : ३३९
मान्यता नसलेल्या शाळा : १०