जळगाव : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दरमहा १०० कोटी रुपयांच्या हप्ता वसुलीसाठी दबाव टाकल्याचा हास्यास्पद आरोप केला आहे. त्याचा जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलतर्फे हवेत १०० फुगे सोडून प्रतीकात्मक निषेध नोंदविण्यात आला.
वाझे प्रकरणावरून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांची मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांनी राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील बार मालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये हप्ता वसुली करण्याचा दबाव टाकल्याचा पत्राद्वारे आरोप केला आहे. हा आरोप मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी झाल्याने नैराश्यातून केला आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत महाविकास आघाडीने जनतेच्या रक्षणासाठी अनेक चांगले निर्णय घेतल्याने जनतेचा विश्वास महाविकास आघाडीने संपादन केला आहे. राज्यातून सत्तेच्या बाहेर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या भाजपाई टीमने राज्य शासनाला खोट्या नाट्या कारणांवरून बदनाम करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. वाझे प्रकरणातून यथावकाश वस्तुस्थिती बाहेर येणारच आहे. परमबिरसिंह हेदेखील या प्रकरणातील मोहरा असून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हवेत गोळीबार करणाऱ्यांचे मनसुबे सफल होणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अर्बन सेलतर्फे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांचा निषेध करण्यासाठी शंभर फुगे हवेत सोडून निषेधाचे अभिनव प्रतीकात्मक आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलचे समन्वयक मूवीकोराज कोल्हे, जुबेर खाटीक, प्रवीण महाजन, विनोद मराठे, नाना साळुंखे, टिपू सय्यद, लालाभाई, सादिक खाटीक, सादिक शेख, विकास चौधरी, अजय सोनवणे, नावेद शेख, नासिर शेख, माजी नगरसेवक फारुख , आसिफ शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.